केरळमध्ये वर्षभर दुखवटा, मुख्यमंत्री विजयन यांची घोषणा

सामना ऑनलाईन । थिरुवनंतपूरम

केरळ राज्य भीषण महापूर आणि पावसाच्या आपत्तीने पार उद्ध्वस्त झाले असून आता राज्याच्या पुनर्वसनासाठी सर्वानी कंबर कसली आहे. या परिस्थितीत देशात मनोरंजनाचे आणि आनंदाचे उत्सव व सोहळे साजरे करणे योग्य नाही असे सांगून. राज्यात वर्षभर दुखवटा पाळला जाईल आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल, केरळ युथ फेस्टिवलसह सर्व सोहळे रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री पी विजयन यांनी आज केली.

प्रलयकारी पुरामुळे केरळचे अपरिमित नुकसान झाले आहे.राज्याला पुन्हा पूर्वीसारखे उभे करण्यासाठी 30 हजार कोटी रुपयांची गरज आहे. देशातून लाखो हात मदतीसाठी पुढे येत आहेत यावरून राज्यावर केवढे भीषण संकट आलेय त्याची प्रचिती येते, असे सांगून मुख्यमंत्री विजयन म्हणाले, राज्य संकटात असताना आनंद सोहळे कसले साजरे करायचे? त्यापेक्षा पुरग्रस्तांचे अश्रू पुसून त्यांचे वेगाने पुनर्वसन करण्यावर आमचा भर असेल असे मुख्यमंत्री विजयन यांनी स्पष्ट केले.

57 हजार हेक्टरवरील शेती बर्बाद
राज्यातील पुराने 57 हजार हेक्टरवरील शेती पार बर्बाद झाली आहे. त्यामुळे राज्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. रस्ते, निवासी इमारती, सरकारी कार्यालये आणि अन्य पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान पुराने केले आहे. पुनर्वसनासाठी 30 हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. त्यातील 100 कोटींचा निधी आम्ही लॉटरी तिकीट 250 रुपयांना विकून जमवणार आहोत असे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी दिली.

> पुराने आतापर्यंत 483 जणांचे बळी घेतले असून राज्यातील 14 नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. 3 हजार बचाव शिबिरांत अद्याप 14.50 लाख नागरिक राहत आहेत.

> हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. 9 ते 15 ऑगस्ट या काळात 98.5 मिलिलिटर पावसाचा कयास होता. पण या काळात पाऊस कोसळला 352.2 मिलिलिटर, मग महापुरावर कसे नियंत्रण मिळवणार असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

> पुरानंतर आता प्रदूषित पाण्यामुळे रॅट फेव्हर म्हणजेच लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरली आहे. या रोगाने आतापर्यंत 50 नागरिकांचा बळी घेतला असून शेकडो लोकांना त्याची लागण झाली आहे .पाण्यात मिसळलेल्या उंदराच्या मलमूत्रातून या रोगाचे जंतू माणसाच्या शरीरात जखमांद्वारे प्रवेश करतात अशी माहिती राज्याच्या आरोग्य संचालक डॉक्टर आर सरिता यांनी दिल .