केरळ लव्ह जिहाद : हादियाचा निकाह वैध

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संपूर्ण देशभर गाजलेल्या केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हादिया उर्फ अखिला अशोकन हिचा निकाह वैध ठरवलाय. या प्रकरणात  केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्याचबरोबर हादियाला तिचा पती शफीनसोबत राहण्यासही सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. याबाबतचा केरळ उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

‘हादियाला आपल्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. दोन प्रौढ व्यक्ती आपल्या इच्छेनुसार लग्न करत असतील तर त्याची चौकशी कशी होऊ शकेल ?’ असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने यावेळी विचारला. ‘अर्थात एखादे दाम्पत्य एखाद्या चुकीच्या हेतूने लग्न करुन परदेशात भागण्याच्या प्रयत्नामध्ये असेल तर त्याच्याविरोधात सरकार कारवाई करु शकते’ असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

एनआयएला तपास करण्याचे स्वातंत्र्य

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी ( एनआयए)  ला या प्रकरणाचा तपास सध्या करत आहे. या तपासामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणात तपासासाठी एनआयएला संपूर्ण स्वातंत्र्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर या तपासाचा रिपोर्टही सादर करावा असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाशी संबंधित विदेशात असलेल्या दोन व्यक्तींना वगळून अन्य सर्वांची चौकशी झाली असल्याची माहिती एनआयएने यावेळी न्यायालयात दिली.

हादियाचं जबरदस्तीने धर्मांतर केलं असून तिचा नवरा शफीन हा दहशतवादी संघटनांशी निगडीत आहे. त्यामुळे हे लग्न रद्द करावे अशी मागणी करणारी याचिका हादियाच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात केली होती. केरळ उच्च न्यायालयाने ही याचिका वैध ठरवत हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’ असल्याचा निर्णय दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात हादियाचा पती शफीनने सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली होती.

हादियाचा मानवी बॉम्ब म्हणून वापरण्याची योजना होती; वडिलांचा सर्वोच्च न्यायालयात दावा