‘आई, तुला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा’, मुलाच्या भावनिक पत्राने नेटिझन्सला रडवले

33

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आई आणि मुलाच्या नात्याचे शब्दामध्ये वर्णन करणे कठिण आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’, हे वाक्यही आपण लहानपणापासून ऐकले आहे. कोणत्याही आईला आपला मुलगा प्रिय असतो आणि प्रत्येक मुलाला देखील आई प्रिय असते. या आई आणि मुलाच्या नात्यातील जिव्हाळा केरळमधील एका मुलाने लिहिलेल्या पत्रातून दिसून येत आहे. या मुलाने आपल्या आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गोकूळ श्रीधर असे या मुलाचे नाव असून त्याने लिहिलेल्या पत्रावर नेटिझन्सने कौतुकाचा वर्षाव केला आहे.

काय आहे या पत्रात?
‘माझ्या आईचे लग्न होते. मी खूप विचार करून, ही पोस्ट लिहित आहे. सध्याचे युग असे आहे की, अजूनही लोक दुसरे लग्न स्वीकारत नाहीत. ज्यांची नजर घृणास्पद, शंकास्पद आहे. त्यांनी ही पोस्ट वाचू नये. तुम्ही ही पोस्ट वाचलीत तरी काही फरक पडणार नाही. एका महिलेने केवळ माझ्यासाठी तिचे संपूर्ण तारुण्य वेचले आहे. पहिल्या लग्नानंतर तिने खूप काही सहन केले आहे. तिला मारहाण व्हायची, मारहाणीनंतर तिच्या कपाळातून रक्त यायचे. त्यावेळी मी तिला विचारायचो की तू हे का सहन करतेस? मला आठवतेय की ती केवळ माझ्या भल्यासाठी ते दुःख सहन करायला तयार असायची. जेव्हा मी तिच्यासोबत घर सोडले तेव्हाच मी या क्षणाचा विचार करून ठेवला होता, असे श्रीधरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोस्ट लिहिण्याआधी झालेली घालमेल

तसेच ‘माझी आई, तिची स्वतःची पण काही स्वप्नं होती आकांक्षा होत्या. पण, तिने माझ्यासाठी आपले संपूर्ण तारुण्य वाया घालवले. मला खूप काही बोलायचे नाही. मला असे वाटते की, या भावना अशा आहेत की ज्यांना दाबून किंवा लपवून ठेवण्याची गरज नाही. आई तुला वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा, असे गोकूळने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हे संपूर्ण पत्र मल्याळम भाषेतील आहे.

नेटिझन्सने केले स्वागत

दरम्यान, मुलाने आईबाबत एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली असून त्याचे कौतुक होत आहे. आतापर्यंत या पत्राला 39 हजार लोकांना लाईक केले आहे, तर जवळपास साडेचार हजार लोकांनी शेअर केले आहे. तसेच साडे तीन हजार लोकांनी यावर कमेंट केली आहे. अनेकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर काही नकारात्मक कमेंटही केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या