केरळ: जामा मशिदीत दिवसातून एकदाच लाऊडस्पीकरवर अजान

सामना ऑनलाईन । वझक्कड

ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील वझक्कडमधील मशिदींनी अजानसाठी लाऊडस्पीकर वापरण्यावर स्वतःहूनच बंधन घालून घेतले आहे. मशिदींच्या व्यवस्थापनाने परस्पर चर्चेअंती हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, वझक्कडमधील मुख्य मशिद असलेल्या वालिया जामा मशिदीत दिवसातून एकदाच अजानसाठी लाऊडस्पीकर वापरला जाईल. वझक्कडमधील इतर १७ मशिदींमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकर वापरला जाणार नाही.

वझक्कड येथे सात मशिदी असून शहरापासून काही अंतरावर आणखी १० मशिदी आहेत. मशिदीत लाऊडस्पीकरवर दिवसभरात वेगवेगळ्या वेळी अजान होते आणि यामुळे जनतेला विशेषतः शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी लाऊडस्पीकर वापरण्यावर स्वतःहूनच बंधन घालून घेतल्याचे वझक्कड मशिद समितीचे अध्यक्ष टी पी अब्दुल अझीझ यांनी सांगितले. शहरातील सर्व मशिदींमधील अजानची वेळ एकच असेल असे एकमताने ठरवण्यात आले. अजानशिवाय अन्य कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पीकरचा वापर न करण्याचा निर्णयदेखील मशिदींनी घेतला आहे.