Sabarimala temple महिला प्रवेशाच्या वादानंतर पहिल्यांदाच मंदिराचे दरवाजे उघडले

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महिलांना प्रवेश देण्यावरून झालेल्या वादानंतर केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला मंदिराचे दरवाजे मंगळवारी उघडण्यात आले. मल्याळम पवित्र महिना कुंबम दरम्यान मासिक पुजेसाठी मंगळवारी शबरीमाला मंदिर पाच दिवसांसाठी (12 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी) उघडण्यात आले.

मंदिराचे मुख्य पुजारी वासुदेवन नंपूतिरी यांनी मंगळवारी सायंकाळी मंदिराच्या गर्भगृहाचे दरवाजे उघडले. कुंबम दरम्यान भगवान अय्यप्पा मंदिरात विविध पुजाकर्म आणि मंत्रजाप होणार आहेत. पुजेदरम्यान मंदिराचे प्रमुख पुजारी कंडाकारू राजीवरूही उपस्थित असणार आहेत.

न्यायालयाच्या निर्णयानंतर शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यावरून केरळमध्ये रणकंदन उसळले होते. भगवान अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी याला तीव्र विरोध केला होता आणि त्यानंतर हिंसाचार उसळला. या दरम्यान, दोन महिलांनी पोलिसांच्या सुरक्षेमध्ये मंदिरात प्रवेश केल्याचे समोर आले. वाढता विरोध आणि केरळ सरकार व पोलिसांची भूमिका पाहता पुजाऱ्यांनी मंदिर बंद करण्याचीही धमकी दिली होती.

दरम्यान, मंदिर उघडण्यात आल्यानंतर विविध संघटनांच्या विरोधाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे असल्याने मंदिर परिसराची सुरक्षा वाढण्यात आली आहे. येथे अनेक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.