KGF चित्रपटाच्या नायकाच्या प्रचारामुळे मुख्यमंत्र्याचा मुलगा पराभूत

204

सामना ऑनलाईन, बंगळुरू

कोलार गोल्ड फिल्ड या चित्रपटामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेला अभिनेता ‘यश’  असंख्य हिंदी चित्रपट रसिकांनाही आवडायला लागला. या यशने लोकसभा निवडणुकीमध्ये अभिनेत्री सुमालथा यांच्यासाठी प्रचार केला होता. यशला पाहण्यासाठी सुमालथा यांच्या रोड शोला प्रचंड गर्दी व्हायची. सुमालथा या स्वत: अभिनेत्री असल्याने त्या स्वत: बऱ्याच प्रसिद्ध आहेत. मात्र यशने त्यांच्यासाठी केलेल्या प्रचारामुळे त्यांचा विजय अत्यंत सुकर झाला.

सुमालथा यांनी पहिल्याच प्रयत्नात कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखील याचा पराभव केला आहे. मांडया मतदारसंघ हा देवेगौडा कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघासाठी निखील याने हट्ट धरल्याने माजी पंतप्रधान देवेगौडा यांना तुमकूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली होती असं बोललं जातं. देवेगौडा स्वत: हरलेच शिवाय नातू निखीलही हरला.

सुमालथा या कर्नाटकमधील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते अंबरिश यांच्या पत्नी आहेत. अंबरिश हे  याच मांड्या लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते. सुमालथा यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती. भाजपने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेत सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली होती.  याशिवाय यश सारख्या कलाकारानेही त्यांच्यासाठी जबरदस्त प्रचार केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या