खाण्याची चंगळ… धम्माल

नवोदित अभिनेत्री गौरी इंगवले हिची खाद्ययात्रा म्हणजे मस्त मज्जा!

 • ‘खाणं’ या शब्दाची तुझ्या दृष्टीने व्याख्या काय? – खाणं प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचं आहे.
 • खायला काय आवडतं? – महाराष्ट्रीयन पदार्थ मला जास्त आवडतात. गोड जेवणापेक्षा खूप चटपटीत, तेलकट खायला आवडतं. घरचं जेवण त्यामध्ये चपाती, भाजी, वरण, भात असंही मी खाते. ‘दालचा’हा माझा खास पदार्थ आहे. यामध्ये मटण-भात असतं. लहानपणी मी हेच जास्त खायचं. शिवाय चिकन, मटण, पनीर खाते, पालेभाज्या खायला आवडत नाही, पण खाते. आताच मी काही महिन्यांपूर्वीच खेकडा खायला शिकले. मासे फक्त आईच्या हातचेच आवडतात.
 • खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेतेस? – माझी आई मला जे खायला सांगते ते मी खाते. आता सध्या माझे नृत्याचे क्लास सुरू आहेत, त्यामुळे आई माझ्यासाठी पौष्टिक पदार्थ म्हणून मुगाचे चिल्ले करते. ऑमलेट रोज खाऊ घालतेच.
 • डाएट करतेस का? – आतापर्यंत मी कधी डाएट केलं नाही. भरपूर व्यायाम होतो, त्यामुळे मी सगळंच खाते.
 • आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाते? – बाहेरचं खूप खाते. आठवडय़ातून एकदा बाहेर खाणं होतच.
 • कोणत्या हॉटेलमध्ये जातेस? – ते मूडवर अवलंबून असतं. कधी कधी महाराष्ट्रीयन, तर कधी कॉण्टीनेंटल खायला आवडतं. पूर्वी मी अजिबातच कॉण्टीनेंटल पदार्थ खायचे नाही, चीझही नाही आवडचं, पण आता पास्ता, चिझ, बर्गर खाते.
 • कोणतं पेय आवडतं? – कोल्डिंक पित नाही. चॉकलेट मिल्क शेक कुठेही, कधीही पिऊ शकते.
 • प्रयोगानिमित्त बाहेर असतेस तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळतेस? – प्रयोगाच्या आधी अर्धा तास मी काहीही खात नाही. प्रयोग संपल्यावर हवं तेवढं खाते. अगदी मध्ये काही खावसं वाटलं तर एखादं चॉकलेट वगैरे खाते.
 • नाटकाच्या दौऱ्यानिमित्त आवडलेला पदार्थ?- पुण्यात बालगंधर्वला गेलो तिथे चपाती-भाजी आवडली होती. तिथे प्रयोगाच्या आधीमँगो कुल्फी खाल्ली होती. तेव्हा थोडा त्रासही झाला होता. तेव्हापासून ठरवलं मी प्रयोगाच्या आधी काहीच थंड खाणार नाही.
 • स्ट्रीट फूड आवडतं का? – खूप आवडतं. रस्त्यावरचं चायनिज, उसाचा रस, सँडविच हे आवडीचे पदार्थ. चाटमध्ये फक्त पाणीपुरी आणि भेळ कधीही, कुठेही खाऊ शकते.
 • घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?– पिठलं, भाकरी, ठेचा आणि आईच्या हातचं काहीही आवडतं.
 • पाहुणे घरी येतात तेव्हा काय खाऊ घालतेस? – रसमलाई, रसगुल्ला, मॅगी, वेगवेगळ्या प्रकारचे सँण्डविच, ऑमलेट, चॉकलेट मिल्क शेक, पोहे.
 • उपवास करतेस का? – कधी कधी करते. संकष्टीचा उपवास एकदा केला होता.

शेजवान-चीझ सँडविच

ब्रेडवर बटर आणि शेजवान सॉस लावायचं. खूप चिझ घालायचं. हे टोस्ट करायचं. सॉसबरोबर खाता येतं. घाईच्या वेळी कुठे जायचं असेल तर हे सँडविच पटकन करता येतं आणि सोबतही नेता येतं.