अंडे फोडल्याने चिमुरडीवर ११ दिवस बहिष्कार… खापचे तुघलकी फर्मान!

सामना ऑनलाईन । जयपूर

महिलांवर सतत बंधने घालणाऱ्या खाप पंचायतीच्या तुघलकी फर्मानामुळे एक ५ वर्षाची चिमुरडी बेघर झाली आहे. राजस्थानमधील बूंदी जिल्ह्यात राहणाऱ्या या मुलीच्या हातून चुकून टिटवीचे अंडे फुटले. मुलीच्या हातून नकळत घडलेल्या या कृत्यास खाप पंचायतीने ‘अपशकून’ ठरवले असून तिच्यावर ११ दिवसांसाठी बहिष्कार घालण्याचे फर्मान सोडले आहे. तिला घरात राहण्यास मनाई करण्यात आली असून कोणी तिच्याशी बोलले अथवा तिला जेवण देण्याचा प्रयत्न जरी केला तर मुलीच्या शिक्षेत वाढ केली जाईल असा फतवाही खापने काढला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही चिमुरडी घराच्या अंगणात एका खाटेवर उपाशीपोटी बसून आहे.

ही मुलगी हरिपुरा येथील राजकीय प्राथमिक शाळेत शिकते. काही दिवसांपूर्वी तिला शाळेत अडगळीच्या सामानाजवळ टिटवीची अंडी दिसली. तिने ती उत्सुकतेपोटी उचलली. त्याचवेळी त्यातील एक अंडे तिच्या हातातून खाली पडले व फुटले. हे पाहताच इतर मुलांनी ही गोष्ट शिक्षकांना व पालकांना सांगितली. काही वेळातच अंडे फुटल्याचे हे वृत्त वाऱ्यासारखे गावभर पसरले आणि बघता बघता खाप पंचायतीपर्यंत पोहोचले. त्यानंतर सगळा गावच मुलीच्या घरी गोळा झाला.

मुलीला व तिच्या घरातल्यांना पंचायतीने धारेवर धरले. टिटवीचे अंडे फुटणे हा अपशकुन आहे. यामुळे देवाचा कोप संपूर्ण गावावर होणार असे भाकीत पंचांनी केले. त्यानंतर मुलीला ११ दिवसांसाठी घराबाहेर ठेवावे. खाण्यापिण्यास देऊ नये, तिच्याशी कोणी बोलू नये अशी शिक्षा पंचांनी जाहीर केली. हे ऐकताच मुलीच्या वडिलांनी यास विरोध केला. यावर पंचांनी त्याला संपूर्ण कुटुंबालाच घराबाहेर हाकलून देऊ अशी धमकी दिली. यामुळे मुलीला तडफडताना बघण्याव्यतिरिक्त घरातल्यांकडे दुसरा पर्याय नव्हता. तरीही तिच्या वडिलांनी हिंमत करत पोलिसांत याबद्दल तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.