…म्हणून तिनं बाळाचं अपहरण केलं, पोलिसांसमोर भडाभडा बोलली

126

सामना ऑनलाईन |मुंबई

नायर हॉस्पिटलमधील पाच दिवसाच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेने अखेर अपहरणाचं खरं कारण सांगितलं आहे. आपण गर्भवती असल्याचं खोटं झाकलं जावं म्हणून अपहरणाचा डाव आखला होता, असं तिने चौकशी दरम्यान स्पष्ट सांगितलं. तसंच आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप होत असल्याचं देखील ती म्हणाली.

37 वर्षांची आरोपी हझेल कोरिया ही वसई येथे राहत असून ती गर्भवती असल्याचं खोटं तिनं घरच्यांना सांगितलं होतं. हे खोटं उघडं पडू नये यासाठी तिने अपहरणाचा कट रचला आणि हे कृत्य करण्याचं धाडस केलं, असं तिनं सांगितलं.

आग्रीपाडा पोलीस ह्या घटनेचा तपास 13 जून पासून करत होते. बाळाची जन्मदाती आई शितल साळवी आणि बाळाचे रक्ताचे नमुने डीएनए तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचबरोबर बाळावर आपला हक्क सांगणाऱ्या कोरिया हिला देखील रक्त तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलं. तिथे पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर घाबरलेल्या कोरियानं भडाभडा सगळं खरं ते सांगितलं.

या दरम्यान, हॉस्पिटलनी दिलेले मुलाचे ओळखपत्र वान्द्रे येथील वांद्रे-वरळी सी लिंक येथे आरोपीने फेकले होते पोलिसांनी शोधून काढले. आरोपी कोरिया हिने 13 जून रोजी बाळाची आई झोपलेली असताना बाळाचे अपहरण केले होते. नंतर ती व्ही.एन देसाई या हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन गेली व हे बाळ माझे असल्याचा दावा करू लागली. पण, डॉक्टरांना ती खोटं बोलते आहे, असा संशय आला. त्यांनी सावध होऊन पोलिसांना पाचारण केले आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या