किल्लारी कारखाना सुरू होणार, 20 वर्षासाठी प्रथमेश संस्थेसोबत करार


सामना प्रतिनिधी । किल्लारी

औसा तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेकराराने चालवण्यास देण्याचे निश्चित झाले असून प्रथमेश संस्थेसोबत 20 वर्षाचा करार झाला आहे. किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे .या कारखान्यावर बँकेचे कर्ज आहे. कर्जात बुडाल्यामुळे कारखाना बंद पडला. हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. त्याला यश आले आहे. विनय कोरे यांच्या प्रथमेश्वरा गृह निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर या संस्थेने यासाठी प्रस्ताव दिला होता. दिनांक 6 सप्टेंबर रोजी संस्थेने सुधारित प्रस्ताव दिला. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेने हा कारखाना 2018-19 ते 2037-38 पर्यंत या संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कारखाना प्रथमेश्वरा या संस्थेला देण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

करार करण्यापूर्वी संस्थेने आगाऊ भाडे पोटी 85 लाख रुपये बँकेकडे जमा करावे. ईएम डी पोटी बँकेला प्राप्त झालेली पंचवीस लाख रुपयांची रक्कम आगाऊ भाडे रकमेपोटी वळती करून घ्यावी. भाडेकरूने प्रतिवर्षी एक कोटी दहा लाख रुपये तसेच टॅंगिंग प्रमाणे प्रति टन 110 रुपये रक्कम प्रत्यक्षात होणाऱ्या गाळपावर अदा करावी. या कारखान्याची पूर्वीची, चालू व भविष्यातील वैधानिक देयता भागवण्याची जबाबदारी भाडेकरुची असेल. गाळप झाल्यानंतर भाडेकरूने 30 दिवसात उत्पादनाचा तपशील बँकेत सादर करावा. कारखाना मालमत्तेवरील बँकेचा प्रथम श्रेणीचा चार्ज कायम राहील. ज्यावर्षी गाळप होणार नाही त्या वर्षीही एक कोटी दहा लाख रुपये रकमेचा भरणा करावा लागेल. कारखान्यातील यंत्रसामुग्रीची दुरुस्ती आणि बदल करावयाचा असल्यास बँकेची लेखी परवानगी घ्यावी लागेल. कारखान्यातील यंत्रसामग्रीचा प्रतिवर्षी विमा काढावा लागेल अशा अटींचा यात समावेश आहे. या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास करार संपुष्टात येईल आणि कारखान्याचा ताबा बँकेस द्यावा लागेल असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या त्रिपक्षीय भाडे कराराचा मसुदा बँकेच्या पॅनलवरील वकिलाकडून तयार करून घ्यावा असे पत्र प्रभारी व्यवस्थापकीय संचालक आर एल बायस यांनी दिले आहे. कारखाना सुरू होणार असे शेतकऱ्यांना समजताच किल्लारी सह परिसरातील शेतकऱ्यांनि फटाके वाजवून आनंद व्यक्त केला