या माथेफिरूला संपवा!

संयुक्त राष्ट्र संघाने कठोर निर्बंध लादले असताना सगळा विरोध लाथाडून उत्तर कोरियाचा माथेफिरू हुकूमशहा शक्तिशाली अणुस्फोट घडवतो. एका खंडातून दुसऱया खंडात अण्वस्त्रहल्ला करता येईल, अशा  क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतो, हायड्रोजन बॉम्बचे धमाके घडवतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, पृथ्वीचा विनाश करण्याची खुमखुमी, सनकी किम जोनला आली आहे. त्याचे भयंकर स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्याला ठेचले पाहिजे. जगभरातील देशांनी एकत्र येऊन या माथेफिरूला संपवायलाच हवे!

उत्तर कोरियाचा तऱहेवाईक हुकूमशहा किम जोन  उन याचा उच्छाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. संपूर्ण जगाचा विनाश करण्याचा विडाच जणू या पाताळयंत्री हुकूमशहाने उचलला आहे. अमेरिकादी देशांत महासंहार घडवून लक्षावधी माणसे मारण्याचे क्रूर स्वप्न किम जोन बघतो आहे. दिवाळीमध्ये आपल्याकडे लहान मुले जशी फटाक्यांची लड वगैरे लावतात त्याच पद्धतीने अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बचे स्फोट घडविण्याचा सपाटाच या माथेफिरू हुकूमशहाने लावला आहे. त्यावरून अमेरिका आणि उत्तर कोरियात जबरदस्त संघर्ष पेटला आहे. दोन्ही देशांतील तणाव इतका विकोपाला गेला आहे की, नजीकच्या काळात अमेरिका आणि उत्तर कोरियात अणुयुद्ध भडकू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर कोरियाने अलीकडेच केलेला हायड्रोजन बॉम्बचा धमाका आणि लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची चाचणी यामुळे उभय देशांत पुन्हा ठिणगी पडली आहे. हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीतून संपूर्ण जगाला ५.९ रिश्टर स्केलच्या भयंकर धक्क्याने हादरवणाऱया उत्तर कोरियाने जपानला तर घामच फोडला. शत्रू राष्ट्र असलेल्या जपानच्या डोक्यावरून उत्तर कोरियाने अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र डागले. तब्बल ३ हजार ७०० किलोमीटर अंतर पार करून प्रशांत महासागरात हे क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर ही चाचणी यशस्वी झाल्याचा जल्लोष हुकूमशहा किम जोन याने केला होता. उत्तर कोरियातून आम्ही सातासमुद्रापलीकडे असलेल्या अमेरिकेवरही अणुबॉम्बचा हल्ला करू शकतो, असा

संदेश देण्यासाठीच

उत्तर कोरियाने ही चाचणी घेतली होती हे उघड आहे. शिवाय उत्तर

कोरियाचा पारंपरिक वैरी दक्षिण कोरिया आणि जपानलाही त्याने धडकी  भरवली. उत्तर कोरियाने अशी आगळीक केल्यानंतर महासत्ता अमेरिका गप्प बसणे शक्यच नव्हते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ उत्तर देऊन उत्तर कोरियाला बेचिराख करण्याची धमकी दिली.  जगाने आजवर कधीही पाहिला नसेल असा भयंकर बॉम्बवर्षाव करून उत्तर कोरियाला उद्ध्वस्त करू, असा दम ट्रम्प यांनी दिला होता.   त्यापाठोपाठ आता उत्तर कोरियानेही अमेरिकेला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. आमची अणुबॉम्बच्या हल्ल्याची धमकी अमेरिकेने गांभीर्याने घ्यायला हवी, असेही उत्तर कोरियाने बजावले आहे. उभय देशांतील वाढत्या तणावामुळे जगावर अणुयुद्धाचे ढग जमू लागले आहेत. हुकूमशहा किम जोन हा आधीच उलटय़ा काळजाचा माणूस म्हणून कुप्रसिद्ध आहे. तो कधी काय करेल हे त्याचे त्यालाच ठाऊक नसते. त्याच्या सनकीपणाचे अनेक किस्से आहेत. कधी तो बैठकीत डुलकी काढणाऱया आपल्याच संरक्षण दलाच्या प्रमुखाला तोफेच्या तोंडी देऊन खतम करतो. वरचढ होत असल्याच्या संशयावरून आपल्या अत्यंत जवळच्या नातेवाईकावर शिकारी कुत्रे सोडतो. अनेक दिवस उपाशी ठेवलेली १२० कुत्री आपल्या आप्ताचे लचके तोडून खात असताना पाहून टाळय़ा पिटतो, केवळ संशयावरून कुणालाही विष देऊन मारतो.  इतक्या विक्षिप्त आणि बेभान क्रूरकर्म्याच्या युद्धसामग्रीत अणुबॉम्ब,  हायड्रोजन बॉम्ब आणि

आंतरखंडीय क्षेपणास्त्र

असल्यामुळे ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला…’ अशी परिस्थिती

निर्माण झाली आहे. जगाच्या एकूणच अस्तित्वाला, आकाश, पाताळ, समुद्र आणि तमाम जीवसृष्टीलाच या सैतानाने धोका निर्माण केला आहे. पृथ्वीसाठीच डोकेदुखी ठरलेल्या किम जोनला आवरायचे कुणी व कसे, असा प्रश्न जगभरातील देशांना पडला आहे. जागतिक महासत्ता असलेली अमेरिका आपल्या अफाट लष्करी सामर्थ्याच्या जोरावर उत्तर कोरियाच्या बेलगाम हुकूमशहाला शिंगावर घेण्याचा प्रयत्न करत असली तरी त्याचा यत्किचितही परिणाम  किम जोनवर होताना दिसत नाही. उलट अमेरिकेच्या डोळय़ात डोळे घालून किम जोन जागतिक महासत्तेला धमकावतो आहे. अर्थात गेल्या काही वर्षांत उत्तर कोरियाने महासंहारक क्षेपणास्त्रांची प्रचंड जमवाजमव केली आहे. त्या जोरावरच अमेरिकेशी पंगा घेण्याची भाषा हा मस्तवाल देश करतो आहे. संयुक्त राष्ट्र संघाने कठोर निर्बंध लादले असताना सगळा विरोध लाथाडून उत्तर कोरियाचा माथेफिरू हुकूमशहा शक्तिशाली अणुस्फोट घडवतो. एका खंडातून दुसऱया खंडात अण्वस्त्रहल्ला करता येईल, अशा  क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतो, हायड्रोजन बॉम्बचे धमाके घडवतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, पृथ्वीचा विनाश करण्याची खुमखुमी, सनकी किम जोनला आली आहे. त्याचे भयंकर स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्याला ठेचले पाहिजे. जगभरातील देशांनी एकत्र येऊन या माथेफिरूला संपवायलाच हवे!

  • MD

    make sure this country had and has never directly interfere any of our internal matter and never supports our enemies against India. It is none of our business ,as we have no guts to control our neighboring countries like nepal, china and bangladesh. Pakistan is far away from our control. Its better not to create unwanted people as enemy because short or lack of ground level information.