प्राण्यांमधील माणुसकी

निलेश मालवणकर

माणुसकी ही फक्त माणसांतच असते का? किंबहुना ती प्राण्यांमध्येच जास्त आढळते….

निसर्गात भ्रमंती करणारे तसेच जंगलात रमणारे वनप्रेमी तसेच गिर्यारोहक, हायकर्स, ट्रेकर्स यांनी प्राण्यांमधील माणुसकी बऱयाच प्रसंगी विविध वेळी अनुभवली असेल हे निश्चित.

प्राण्यांमधील या माणुसकीचा एक आगळावेगळा प्रत्यय नुकताच आला. मी, माथेरान येथील जंगल भ्रमंतीला गेलेलो असताना जंगलात भरपूर भ्रमंती करून ‘रेस्ट’ हाऊसमध्ये आलो. खिशातील पैशाचे पाऊच काढून ते खिडकीजवळ ठेवलं आणि थोडासा मागे वळलो तो काय अतिशय चपळाईनं एका माकडाने खिडकीतून हात घालून ते पैशाचं पाऊच पळवलं व थेट पोहोचलं ते ३० फूट उंचीवरील फांदीवर. मी चक्रावलो, अवाक झालो. त्या माकडाकडे आणि त्या पाऊचकडे हताश होऊन मी बघत राहिलो. पाऊचमध्ये होते रुपये 20 हजार, ओळखपत्र, आधारकार्ड, क्रेडीट कार्ड अगदी सर्व-सर्व काही. परंतु या माकडात पण होती माणुसकी!!! त्या माकडाने त्या पाऊचची चांगलीच झाडाझडती घेतली आणि निरीक्षण केलं आणि त्यात त्याला खाण्यासारखं काहीच नाही. पैशाची त्याला हाव नाही. मग काय? दुसऱया क्षणाला त्याने ते पाऊच पैशासकट दिलं सोडून खाली. त्या माकडाकडे मी आदरपूर्वक पाहून ते पाऊच उचलले. तर मला त्यात आढळली त्या माकडाची माणुसकी, त्या जागी माणूस असला तर?

कांगारूतील माणुसकीचा प्रत्यय आला

तो ऑस्ट्रेलियात. ऑस्ट्रेलिया हा कांगारूंचा देश. कांगारू हा एक अजब प्राणी आहे. निसर्गातील एक आगळी-वेगळी देणगी दिलेला हा दोन लांब दुमडलेल्या पायांवर दुडदुड चालणारा, धावणारा, उडय़ा मारणारा मजेदार प्राणी. समोरच २०-३० फुटांचे अंतरावर १५-२० कांगारू कळपाने मस्त उभे होते. माझ्या हातात होते ऑस्ट्रेलियातील वनविभागाने दिलेले खाद्य. ते मी हातावर घेऊन कांगारूंच्या कळपाकडे पहात त्यांना जवळ येणाच्या दृष्टीने बोलत होतो. त्यांच्याकडे प्रेमाने पाहात होता. परंतु त्या कळपातील सर्व कांगारू इकडे तिकडे पाहात न्याहाळत राहिले आणि यातील फक्त दोन कांगारू ज्यांच्या पोटाकडील असलेल्या पिशवीतील पिल्लांसकट माझ्या अगदी जवळ आले. कारण त्या पिल्लांना खाद्याची गरज होती म्हणून. गरजेपुरता; फक्त पिशवीत पिल्लं असलेल्या दोन कांगारू माद्याच पुढे आल्या. तेथे माणूस असता तर? ही माणुसकी कांगारूकडून मी शिकलो. थोडय़ाच वेळात ते दोन कांगारू त्यांच्या कळपात दुडदुड उडय़ा मारत सामील झाले.

आफ्रिकेच्या जंगलातील गेंडय़ात दिसली माणुसकी

दक्षिण आफ्रिकेतील घनदाट जंगलात १०-१२ विद्यार्थ्यांसह जंगल भ्रमंती आणि वन्यजीव अभ्यासासाठी फिरत असताना डावीकडील पाणवठय़ात दिसला बसलेला एक प्रचंड मोठ्ठा सुळा असलेला गेंडा. आम्ही होतो ४० ते ५० फुट अंतरावर. आम्ही सारे जैसे थे स्थितीत त्या ठिकाणीच स्तब्ध उभे राहिलो. नाही केली धावपळ आणि नाही केली पळापळ आणि आरडाओरडा देखील नाही. या प्रचंड शक्तीमान गेंडय़ानी त्या त्याच्या राज्यात दाखवली आम्हाला माणुसकी. गेंडा त्या पाणवठय़ातून उठला. समोर दृष्टी टाकली. कान टवकारले आणि पुढे काय आश्चर्य. तेथून अबाऊट टर्न करून जंगलात दिसेनासा झाला. उगीचच विनाकरण हल्ला न करण्याची वन्यजीवांची मनोवृत्ती असते त्याचा प्रत्यय सर्वांना आला. कारण त्या प्रचंड ताकदवान गेंडय़ानेदेखील दाखवली नम्रता आणि माणसात सध्या न दिसणारी माणुसकी. एक ना दोन असे किती प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात आणि प्राण्यांमधील माणुसकीचा प्रत्यय येतो.