बुडणारे बेट

109

डॉ. विजय ढवळे, कॅनडा

किरीबाटी हे नाव आपण कधी ऐकलेही नसेल. हे दक्षिण पॅसिफिक महासागरात वसलेले आहे. क्षेत्रफळ अवघे ८०० चौ.कि.मीटर्स. लोकसंख्या १ लाख. देशाचे उत्पन्न फक्त एक हजार कोटी रुपये. बेकारी ६० टक्के. बालमृत्यूचे प्रमाण प्रगत देशांपेक्षा दसपटीने जास्त. राजधानीच्या शहरातली लोकसंख्या टोकिओ किंवा लंडनपेक्षाही दाटीवाटीने राहणारी. हवामानतज्ञांचा अंदाज आहे की, २१ वे शतक संपण्याच्या आधीच संपूर्णपणे पाण्यात बुडालेले असेल. कलियुगात जे कोणी २१ व्या शतकाच्या उत्तरार्धात जिवंत असतील त्यांना किरीबाटी त्यांच्या डोळय़ांदेखत महासागराच्या पाण्यामध्ये नाहीशी झालेली पाहायला सापडेल, असे भाकीत शास्त्रज्ञांचे आहे.

या बेटावर अनेकांनी आक्रमणे केली आणि मालकी हक्क काही काळापुरता तरी प्रस्तावित केला आहे. प्रथम समोअन्स (Samaans) आले. ते ऑस्ट्रेलियातले आदिवासी मानले जातात. नंतर फिजीने कब्जा घेतला. गोरे ब्रिटिश लोक ते बेट आपल्या साम्राज्याला जोडण्याच्या दृष्टीने घुसले. दुसरे महायुद्ध सुरू झाले ते डिसेंबर ७, १९४१ला. जपानने टोरा-टोरा-टोरा हा परवलीचा शब्द उच्चारत अमेरिकेच्या हवाई बेटांवर ठेवलेल्या आरमारी बोटींचा चार तासांत भयानक हवाई हल्ला करून सत्यानाश केला. ३०० हून अधिक लष्करी जहाजांना जलसमाधी केली. बाराशे सैनिकांचे मुडदे पाडले. त्यामुळे जपानला पुढची दोन वर्षे पॅसिफिक महासागराच्या परिसरात मोकळे रान सापडले. त्यांच्या झंझावातामधून किरीबाटी बेट सुटणे शक्यच नव्हते. जपान्यांनी ताबा घेतला आणि जेतेपणाचा सर्व माज मिरवून घेतला. अमेरिकनांनी दोन अणुबॉम्ब टाकून जपानचा नक्षा उतरवला. त्यांनी काबीज केलेले देश मलेशिया, बर्मा, सिंगापूर वगैरे स्वतंत्र झाले. त्यात किरीबाटीचाही समावेश होता.

सध्या तेथे काय परिस्थिती आहे? ग्रोसरीची दुकाने आहेत, पण मिळते ते सर्व अन्न इन्स्टंट, झटपट शिजवून तयार होणारे. नूडल्स, ब्रेकफास्ट कुकीज, कॅण्डीज या गोष्टी मिळतात. रस्ते आहेत, पण अनोखे दृश्य पाहायला मिळते. रस्त्यांवर वाहनांच्या बरोबरीनेच चाकांच्या खुर्चीवर बसून जाणारे, मधुमेहाच्या विकारामुळे पाय कापावे लागलेले पेशंटस्ही चाललेले असतात. बेटावर पक्की सडक अशी एकमेव आहे. येशू ख्रिस्ताचे बेटावर फारच बडे प्रस्थ आहे. सर्व कुटुंब एका खोलीच्या झोपडीवजा घरात राहते. सर्वसामान्य माणसाचे अन्न म्हणजे सुकवलेले मासे आणि ते घशाखाली उतरणे सोपे व्हावे म्हणून वरून नारळाचे पाणी ढोसणे. केव्हा वादळे घोंगावतील, समुद्राच्या भरतीच्या लाटा तांडवनृत्ये करतील, हवेतला गारठा अचानक वाढून तापमान शून्याच्या खाली धडकेल- सर्वच अनिश्चित.

पृथ्वीवर ७० टक्के पाणी आहे. समुद्राची पातळी १९९२ पासून म्हणजे गेल्या २५ वर्षांतच तीन इंचांनी वाढली आहे. या शतकाअखेर ती तीन फुटांनी वाढेल, असा तज्ञांचा अंदाज आहे. फक्त पाण्याची पातळी व हवामानातले बदल या दोन कारणांमुळे २००८ पासून सहा वर्षांत जगामध्ये सव्वादोन कोटी लोकांनी स्थलांतर केले आहे. ऑस्ट्रेलियात हेमन नावाचे एक बेट आहे. तेथे टुरिस्टांची देखभाल करण्याकरिता किरीबाटी बेटावरून आजपर्यंत ३१ जणच गेलेले आहेत. या मंडळींना Climate change Refugees म्हटले जाते, परंतु संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्याही ठरावात या निर्वासितांचा उल्लेख नाही. हुकूमशाहीच्या कचाटय़ातून सुटू पाहणाऱयाना राजकीय निर्वासित म्हणतात. सीरिया-लिबियासारख्या युद्धांमुळे या देशांतून वाट फुटेल तिथे पळ काढणाऱयांना मानवतावादी दृष्टिकोनातून आसरा दिला जातो, पण निसर्गाच्या लहरीमुळे केव्हाही आयुष्याची इतिश्री होऊ शकलेल्या दुर्दैवी लोकांना औपचारिक संज्ञा दिली नाही.

किरीबाटीच्या रहिवाशांपुढे स्वतःचे रक्षण स्वतःच करण्यावाचून अन्य पर्यायच नाही. ते सीरियन निर्वासितांसारखे आगंतुक पाहुणे म्हणून शेजारच्या देशांत दत्त म्हणून उभे राहू शकतात किंवा स्वतःचे मूल्य इतके वाढवू शकतात की इतर देशांना त्यांना सामावून घेण्यामध्ये स्वतःचा फायदा दिसून येईल. ऍनोट टाँग हा किरीबाटीचा २००३ पासून पुढची १३ वर्षे अध्यक्षपदी विराजमान झालेला नेता. तो तर जनतेला सतत सांगत असतो की, बाबांनो, तुम्ही हा देश सोडून परागंदा व्हा. कारण हा देशच काही वर्षांत अस्तित्वात असणार नाही. Migrating with dignity हा शब्दप्रयोग तो सारखा वापरत असतो.

ऍनोट टाँग हा जनतेविषयी आंतरिक तळमळ बाळगणारा नेता आहे. तुम्ही देश सोडून जा, असा उपदेश करून स्वस्थ बसला नाही. कारण त्याला माहिती होते. इतर देशांनी आपल्या देशबांधवांना का आश्रय द्यावा? त्यांचे मूल्य वाढवल्याशिवाय ते शक्य नाही. म्हणून त्याने किरीबाटी टेक्निकल कॉलेज चालू केले. नर्सिंगचे क्लासेस काढले. कॉफी कशी बनवावी याचे धडे देणे चालू केले. कारण सामान्य नागरिकाने कॉफी ना कधी पाहिली होती ना बनविली होती. दारिद्रय़ाची भीषणता म्हणजे काय हे किरीबाटीवरच पाहायला मिळते. ३१ लोकांची ऑस्ट्रेलियाने निवड केली. अर्ज आले होते ५० हजार. या लोकांना दोन वर्षांच्या कराराने बद्ध केले गेले आहे. जर त्यांचे काम पसंत पडले तर त्यांना ऑस्ट्रेलियात कायम राहण्याचाही परवाना मिळेल. त्यांच्या दृष्टीने ही संधी म्हणजे सदेह स्वर्गारोहण करण्याइतकीच दुष्कर व दुर्मिळ आहे. या ३१ जणांना एकदम कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या सन्मानार्थ मोठी पार्टी आयोजित केली गेली आहे.

या बेटावरची सर्वात प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे डेव्हिड काटाऊ. त्याने २०१६ च्या रिओ द जानेरोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये वजने उचलण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याला पदक मिळाले नाही, पण त्याच्या वाटय़ाचे वजन उचलून झाल्यावर त्याने खुशीत नाच केला. असे पूर्वी कधी घडले नव्हते. या नाचाचे फोटोज व्हायरल झाले आणि डेव्हिडवर प्रसिद्धीचा प्रकाशझोत पडला. त्याचा उपयोग जगातल्या मानवतावादी संघटनांकडून देणग्या मिळवून बेटाभोवती संरक्षक भिंत बांधण्याचा डेव्हिडचा स्तुत्य विचार आहे.

बेटावरून जे नशीबवान लोक इतर देशांत जाऊ शकले ते आपल्या कुटुंबांकरिता पैसे पाठवतात. देशाच्या उत्पन्नाच्या २० टक्के भाग हा माजी रहिवाशांकडून येतो. न्यूझीलंडला जेव्हा मजूर हवे असतात तेव्हा ते सरळ बेटावर घुसून लोकांना पळवून नेतात. मोफत राबवतात. काम संपल्यावर देशामधून हाकलून देतात. कपडे धुण्याकरिता, टॉयलेट साफ करण्याकरिता या लोकांचा वापर केला जातो. त्यांना हॉटेलमध्ये हाऊसकिपिंग खात्यात भरती केले जाते. त्यांना राहण्याकरिता एक छोटी खोली मिळते. त्यामध्ये ते दाटीवाटीने राहतात. जेवणखाण वेळेवर मिळते हीच त्यांच्या दृष्टीने परमसुखाची गोष्ट असते. गरिबीचा त्यांना शतकानुशतके शाप आहे. त्यामुळे निर्धनतेचा बागुलबुवा त्यांना भेडसावत नाही. फक्त मरताना ‘डिग्निटी’ असावी एवढीच त्यांची माफक इच्छा असते. आपले घरदारच काय, पण संपूर्ण देशच पाण्याखाली निसर्ग गिळंकृत करणार आहे व ते कदाचित आपल्याच डोळय़ांदेखत घडेल ही कल्पनाच किती भयानक आहे. पण केवळ किरीबाटीचेच काय संपूर्ण जगाचेही तेच भवितव्य असेल काय? आपल्या धर्मात संपूर्ण पृथ्वी जलमय झाली असताना विष्णूने अवतार घेऊन ती वाचवली अशी कथा आहे. ज्यू धर्मामध्ये जगबुडी ही पुरामुळे घडली तेव्हा नोहा (आपल्याकडे मनू) बोटीतून ४० पदार्थ व प्राणी यांना घेऊन त्यांना सुखरूप ठेवतो. अशी पुराणकथा आहे. प्रत्यक्षात तसे घडेल का? पूर्वीच्या द्रष्टय़ा ऋषीमुनींना जगाचा अंत कसा होणार हे माहिती होते का? कोणी सांगावे त्यात तथ्यही असेल.

आपली प्रतिक्रिया द्या