मुका

डॉ. विजया वाड

गळ्यात बाळमिठी आणि गोड पापायातील गोडवा आजीआजोबांइतका कोणाला कळणार…?

‘‘राधाबाई, तुमचा फोन’’ विरंगुळाचे व्यवस्थापक म्हणाले. राधाबाईंची दोन्ही मुले ऑस्ट्रेलियात होती. राजेश आणि जयेश या दोघांनी ‘अ’ वर्गाच्या सीनियर होममध्ये राधाबाईंना ठेवले होते.

‘‘माझ्या आईस कशास कमी पडता कामा नये बरं.’’ विरंगुळाच्या व्यवस्थापकांना अगदी दोघांनी बजावलं होतं.

‘‘त्यांना सांग मी बिझी आहे.’’ राधाबाई म्हणाल्या.

‘‘अहो तुमचा राजेशचा फोन आहे ऑस्ट्रेलियावरून.’’

राधाबाई मोबाईल वापरतच नसत त्यामुळे मुलांना काऊंटरवर फोन करण्यावाचून गत्यंतरच नसे.

‘‘अहो असं काय करता?’’ व्यवस्थापक काऊंटवरून उठून राधाबाईंपाशी आले. बघतात तर काय त्यांचा दहा वर्षांचा ‘क्रिश्न’ ज्याला ते लाडाने ‘किशू’ म्हणत. आजीसोबत किल्ला करीत होता. आजी माती लिंपत होती.

‘‘बाबा, आजी आता मला मावळे आणून देणारे. शिवाय किल्ल्यावर आम्ही शिवाजी महाराज ठेवणारोत.’’ किशू देहभान विसरला होता.

‘‘आता रवीदादा, या मातीच्या हातांनी कसा घेऊ फोन? तुझ्या मुलानं माझ्या रिकाम्या आयुष्यात किल्ला भरलाय नं.’’ राधाबाईंचा फुललेला चेहरा बघून रवीदादा परत फोनकडे गेले. ‘‘आज आई बिझी आहेत. किल्ला पुराण चालू. सो।़।़?’’ तिकडनं हसू, इकडनं रिटर्न हसू. फोन बंद.

‘‘आजी, किल्ल्यावर आपण हिरकणी बुरुज करूया?’’

‘‘करूया की. मी स्वतः मातीची हिरकणी करेन. छान रंगवून देईन.’’

‘‘काय सांगतेस काय?’’

‘‘अरे किशू, माझे बाबा प्रसिद्ध मूर्तिकार होते. गणेशाच्या सुंदर सुंदर मूर्ती करीत. मी त्यांची मुलगी. मी तुला अशी झकास हिरकणी करून देईन की देखनेवाले दंग हो जायेंगे.’’ किश एवढा फुलारला, की पूछो मत. त्या मातीच्या हातासकट राधा आजीच्या गळय़ात पडला. खूशम खूश होत त्यानं आजीचा गोग्गोड मुका घेतला. ‘‘कसं गं तुला सुचतं आजी?’’

‘‘अरे, असा मुका मिळाला ना जर का रोज; तर आणखी मस्ताड सुचेल.’’ किशूला कळलेच नाही, आपल्या मुक्यात काय दडलेय? ते फक्त त्यांनाच समजले. प्रिय वाचकांनो, जी माणसाच्या स्पर्शाला वर्षानुवर्षे आचवली आहेत त्यांना ‘एक मुका… त्यापुढे स्वर्ग फिका’ बरं.