पतंग

269

‘‘विहंग, गच्चीवरून खाली ये.’’
‘‘का आई?’’
‘‘आहे काहीतरी महत्त्वाचं.’’
आता कुठे पतंग आकाशात मस्त भराऱया घेऊ लागला होता.
‘‘मी संध्याकाळी येईन,’’ जड अंतःकरणाने पतंग साहिलकडे सोपवून मी घरी परतलो.
‘‘तयार हो. मुलगी बघायला जायचंय.’’
‘‘आता? अगं संक्रांत आहे आज.’’
‘‘तुला पतंग उडवायच्या असेल गच्चीवर. लग्नाचं वय झालं तुझं, तरीसुद्धा..’’
‘‘छंद आहे माझा.’’
‘‘बंद कर तुझा छंद.’’
आपला मुलगा तरबेज पतंगबाज आहे याचं आमच्या मातोश्रींना बिलकुल कौतुक नाही.
‘‘मुलगी डॉक्टर आहे.’’
‘‘ डॉक्टर?’’
‘‘नाक मुरडायला काय झालं?’’
‘‘ती बिझी असणार. मला काय वेळ देणार? कायम रोगराई, ऑपरेशन असल्या नीरस गोष्टी करणार.’’
‘‘फालतू कारणं नकोत.’’

मुलीच्या घरी बसलेला असताना तिला कसं नाकारावं, याचा मी विचार करत होतो.
‘‘सॉरी, आमच्या मुलीला वेळ नव्हता, म्हणून कार्यक्रम आज संक्रांतीच्या दिवशी ठेवावा लागला.’’
मी मातोश्रींकडे पाहिलं.
मुलगी बाहेर आली. तिने तिळाचे लाडू असलेलं पात्र आमच्या समोर ठेवलं.
‘‘तिळगूळ घ्या. गोडगोड बोला.’’ ती हसून म्हणाली.
‘‘आमच्या पियुनेच केलेत लाडू,’’ मुलीची आई.
‘‘अरेवा.’’ मातोश्रींची पसंतीची दाद. असल्या क्षुल्लक कारणांसाठी मी डॉक्टर मुलगी गळ्यात बांधून घेणार नव्हतो.

मुलगा व मुलगी यांना आपापसात बोलायला द्यावं, यावर सर्वांचं एकमत झालं. बंगलीच्या मागच्या बागेत आम्ही दोघं गेलो.
चालता चालता मी एका दगडाला ठेचकाळलो. मी पडणार तेवढय़ात तिने माझा हात धरला. तिच्या बोटांचा खरखरीतपणा मला जाणवला.
‘‘थँक्स,’’मी म्हटलं,’’ एक विचारू?’’
‘‘विचार.’’
‘‘तुझी बोटं एवढी.. खरखरीत..?’’
ती गंभीर झाली.
‘‘स्वयंपाकामुळे की ऑपरेशनमुळे?’’
‘‘नाही.’’
तिने बोटं उलगडली, बोटांवर कापल्याच्या खुणा होत्या.
‘‘तुला ऐकायला विचित्र वाटेल, पण..,या कापल्याच्या खुणा मांज्यामुळे झाल्यात.’’
‘‘म्हणजे..’’ मी तिच्याकडे आश्चर्याने पहात म्हटलं, ‘‘तू पतंग..’’
‘‘हो. मी पतंग उडवते,’’ ती अभिमानाने म्हणाली, ‘‘आवडतं मला ते. आमच्या एरियात माझ्या तोडीचं कुणीच नाही. मोठमोठे ढाल मी उडवते. म्हणून मला सगळेजण ढालगज म्हणतात.’’
मी तिला माझी बोटं दाखवली. तिचेसुद्धा डोळे विस्फारले.
‘‘तूसुद्धा..?’’

सर्वात चांगला मांजा कुठला यावर आम्ही हिरीरीने चर्चा करत असू, तेवढय़ात माझा फोन वाजला.
‘‘विहंग यार, कुठे आहेस? येतो आहेस न पतंग उडवायला?’’ साहिलने विचारलं.
‘‘नाही यार,’’ पतंगाविषयी भरभरून बोलत असलेल्या पियुला नजरेत साठवत मी म्हटलं, ‘‘मित्रा, माझी पतंग कटली रे.’’

आपली प्रतिक्रिया द्या