पतंगांचे दिवस

नितीन फणसे

संक्रांत म्हणजे पतंग… गुजराथेत पतंग महोत्सव साजरा केला जातो….

अशी बनते पतंग

पतंग बनवण्याची एक कला आहे. त्यासाठी चौकोनी पातळ कागद आणि दोन बारीक काडया लागतात. या कागदाच्या एका कोनाकडून दुसऱया कोनापर्यंत एक काडी चिटकवायची. त्यानंतर राहिलेले दोन कोनाला दुसरी, पण थोडी मोठी काडी चिटकवायची. ही मधली काडी मोठी असल्याने थोडी बेंड होते. पतंग बनवताना पातळ कागद आणि बारीक काडया वापरण्याचा उद्देश हाच की हवेने पतंग चांगली उडत राहील. त्यांच्या वजनाचा त्यांच्या उडण्यावर काहीच परिणाम होत नाही. ही झाली साधी पतंग बनवण्याची पद्धत… पण अलीकडे खूप मोठय़ा आकाराच्या पतंगा बनवल्या जातात. त्या बनवायला मोठमोठे कारखानेही आहेत. काहीवेळा तर पतंगा अनेक मजल्यांपर्यंत उंच असतात. हल्लीच्या पतंगा वेगवेगळ्या आकारांच्या, रंगांच्या आणि डिझाइन्सच्याही मिळतात.

दमदार मांजा…

पतंग उडवताना ज्याचा मांजा चांगला तो इतरांच्या पतंगा सपासप कापणार… त्यासाठी मांजाही तसा दमदार लागतो. ‘ढील छोडना नहीं आता तुमको..’, ‘लपेट, लपेट..’ ही सगळी वाक्यं मांजा कसा असला पाहिजे हेच सूचित करतात. हा मांजा बनवण्याचीही एक खास पद्धत आहे. पूर्वी मांजा साध्या कापसाच्या धाग्यापासून बनवायचे, पण आता काचेची पूड करून त्यात धागा बुडवतात. काच धाग्याला चिकटावी यासाठी मांजाला आधी गोंद किंवा भात लावला जायचा. पतंग उडवताना तर जबराट मजा येतेच, पण समोरच्याची पतंग काटल्यावर किंवा दुसरी मुलं पतंग उडवत असतील तर ते बघायलाही गंमत वाटते. हा मांजा लपेटायलाही एक खास प्रकारची फिरकी लागते.

महोत्सव पतंगांचा…

संक्रांतीला गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित केला जातो. पाच दिवस चालणाऱया या महोत्सवात तब्बल 42हून अधिक देशांमधले पतंगबाज आपली कला दाखवायला येत असतात. या महोत्सवात एकीकडे देशविदेशातील पतंग उडविणारे पाहायला मिळतात आणि दुसरीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगांचंही लोकांना आकर्षण असतं. हजारो लोक या महोत्सवाचा आनंद तेथे उपस्थित राहून घेत असतात. बेल्जियमहून आलेले रोजर स्टीवन्स यंदा दुसऱयांदा आले आहेत. हा महोत्सव भरतो तेव्हा हवा थोडी कमी वाहात असते. अशावेळी पाण्याचे फुगेही उडवले जातात. ते पाहायची मजाही काही औरच असते. 14 जानेवारीला हा पतंग महोत्सव चरम सीमेवर पोहोचेल. तेव्हा अख्ख्या अहमदाबादमध्ये लोक आपापल्या घरांच्या छतांवरूनही पतंग उडवताना दिसतील.

पतंग आणि फिरकी… नुसती बघितली तरी मन जुन्या दिवसांत हरवून जातं… कधी एकदा जानेवारी महिना येतो आणि पतंग उडवायला मैदानात जातो असं होऊन जायचं… मग पतंग आणायला आईकडे पैशासाठी केलेला हट्ट… त्या रंगीबेरंगी पतंगा… दीपूचा बदला घेण्यासाठी ठरवून त्याची काटलेली पतंग… ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातलं पतंग कापल्यावरचं ‘कायपोचे’ ओरडणं… त्यानंतर ‘ढील दे ढील दे दे रे भैय्या’ हे गाणं… असे कितीतरी किस्से आठवतात. मंडळी, पतंग उडवणं हा खेळ की परंपरा हे सांगणं तसं कठीणच… पण तो खेळ मानून त्यात रंगून जायला अनेकांना नक्कीच आवडत असणार.. पण यात इतर खेळांप्रमाणेच मोठा जोश, उत्साह आणि जिद्द लागते. त्यादृष्टीने हा खेळच… पण हा खेळ निकोप आहे.

परंपरा आणि संस्कृतीशी हा खेळ जोडला गेला आहे त्यामागेही काहीतरी विशेष कारण असले पाहिजे. समाजातील लोकांनी एकत्र नांदावं म्हणजेच संस्कृती… त्यामुळे पतंग उडवताना सगळ्यांनी मिळून मौजमजा करायची असते. त्या दृष्टीनेही संस्कृतीशी पतंग उडवण्याचा संबंध जोडला जाऊ शकतो.

संक्रांतीला पतंग उडवण्याची आपली परंपरा आहे. पण ही पतंग नेमकी आपल्याकडे आली कुठून ते बघितले पाहिजे. म्हटलं जातं की हिंदुस्थानात हा खेळ फाहायान आणि व्हेनसांग या चिनी माणसांनी आणला. जानेवारी महिन्यातली गुलाबी थंडी आणि त्यातच मकर संक्रांत याचा या पतंग उडवण्याच्या परंपरेशी दाट संबंध असला पाहिजे. पंजाब आणि हरयाणात वसंत पंचमीला पतंगबाजीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, तर पाकिस्तानात ‘जश्न-ए-बहारा’ या दिवशी पतंगोत्सव साजरा केला जातो. दिल्लीत तर लोक आपापल्या छतांवर पतंग उडवतातच, पण काहीजण खुल्या मैदानातही पतंगांचा आनंद घेतात. पाटण्यातही तेथील गांधी मैदानात या दिवसांत पतंगा उडवण्याची धूम असते.