लोकेश राहुलचं सलग ७वं अर्धशतक, विश्वविक्रमाची केली बरोबरी

सामना ऑनलाईन । कॅण्डी

श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात हिंदुस्थाननं प्रथम फलंदाजी करत सावध सुरूवात केली आहे. ओपनिंग जोडीनं लंचपर्यंत १३४ धावा ठोकल्या आहेत. लोकेश राहुलनं पुन्हा एकदा चमकदार कारगिरी करत सलत सातवं अर्धशतक झळकावलं आहे. दुखापतीनंतरही राहुलचा फॉर्म कायम असल्यानं संघासाठी त्याचा खेळ लाभदायक ठरत आहे. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ३ सामन्यात सलग ५ अर्धशतकं त्याने ठोकली होती. त्यानंतर पुनरागमन करणाऱ्या राहुलनं श्रीलंकेविरूद्ध दोन अर्धशतकं ठोकली.

श्रीलंकेविरूद्ध कोलंबो कसोटीत त्यानं ५७ धावांची खेळी केली होती. याआधी अशी कामगिरी एवर्टन वीक्स, अॅन्डी फ्लावर, शिवनारायण चंद्रपॉल, कुमार संगकारा आणि क्रिस रोजर्स यांनी केली आहे. या खेळाडूंच्या रेकॉर्डची बरोबरी राहुलनं केली आहे. हिंदुस्थानचा विचार केला तर, सलग ७ अर्धशकतं ठोकत राहुलनं गुंडप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडला आहे. गुंडप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविडच्या नावे सलग सहा अर्धशतकांचा रेकॉर्ड होता.