प्रशासनाचा हलगर्जीपणा, ‘कडोंम’चे १८ लाखांचे उत्पन्न बुडाले

3

सामन प्रतिनिधी । डोंबिवली

गर्दीचे शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच या गाडय़ा पार्क करायच्या तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिकेने टीडीआरच्या माध्यमातून बांधलेले पाटकर प्लाझा या इमारतीमधील वाहनतळ गेली दोन वर्षे धूळ खात पडून आहे. त्यामुळे पालिकेचे १८ लाखांचे उत्पन्न बुडाले असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही वेळ आली आहे. वाहनतळ बांधून तयार आहे, पण तीन वेळा टेंडर काढूनही अद्यापि ठेकेदार मिळाला नाही. सुविधा असूनही त्याचा उपयोग होत नसल्याने वाहनचालकांमध्येही संतापाचे वातावरण आहे.

महापालिकेचे स्वत:चे कल्याणमध्ये एकमेव वाहनतळ आहे. डोंबिवलीकरांनाही ही सुविधा मिळावी म्हणून दोन वर्षांपूर्वी चिमणी गल्ली येथे खासगी विकासकाकडून पाटकर प्लाझा ही पाच मजली इमारत बांधण्यात आली. टीडीआरच्या माध्यमातून बांधलेल्या या इमारतीत तळ अधिक एक मजल्यावर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अन्य मजल्यांवर निवासी घरे, दुकाने तसेच कार्यालये आहेत. वाहनतळात सुमारे ३०० दुचाकी व ५० चारचाकी वाहने राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे, पण पालिका प्रशासनाच्या आस्ते कदम कारभारामुळे या वाहनतळाचा अद्यापि वापरच सुरू झालेला नाही.

डोंबिवली शहरात तीन ते चार लाख एवढी वाहनांची संख्या असताना पी.पी.चेंबर्स येथे केवळ एकच खासगी वाहनतळ आहे. मात्र ते अपुरे पडत असल्याने डोंबिवलीकर मिळेल त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी व दुचाकी वाहने पार्क करतात. त्यामुळे रस्त्यांवर टॅफिक जाम होत असून सर्वसामान्य नागरिकांना चालतानाही त्रास होतो. पाटकर प्लाझा येथील हक्काचे वाहनतळ सुरू झाल्यास स्टेशन परिसरातील रस्तेदेखील मोकळे होणार आहेत. कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनसमोर महापालिकेचे दिलीप कपोते वाहनतळ असून तेथे दुचाकीसाठी दहा रुपये तर चारचाकीसाठी ३० रुपये प्रतिदिवस एवढा दर आकारला जातो. तो लक्षात घेतला तर डोंबिवलीचे वाहनतळ दोन वर्षे पडून असल्याने महापालिकेचे सुमारे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ट्रान्सफॉर्मरचा अडथळा दूर
महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी काही दिवसांपूवी डोंबिवलीतील पालिकेच्या नव्या वाहतळास भेट देऊन पाहणीदेखील केली होती. बाजीप्रभू चौकातील वाहनतळाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला महावितरणचा ट्रान्सफॉर्मरचा अडथळादेखील दूर केला होता. वाहनतळासाठी तीन वेळा टेंडर काढले, पण कुणी ठेकेदार पुढे आला नाही. आता पुन्हा टेंडर काढणार असल्याचे प्रभागक्षेत्र अधिकारी अमित पंडित यांनी सांगितले.