मोहर्रमच्या मिरवणुकीमध्ये बस घुसली, दोघांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये मोहर्रमच्या मिरवणुकीमध्ये केएमटी बस घुसल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण जखमी झाला आहे. शहरातील पापाची तिकटी भागामध्ये मोहर्रमनिमित्त आयोजित पंजा मिरवणुकीमध्ये ही बस घुसल्याने अपघात झाला आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि मिरवणुकीतील नागरिकांवर ही बस चढल्याची प्राथमिक माहिती आहे. तानाजी भाऊ साठे (५०) आणि सुजल भानुदास अवघडे (१५) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातात दहाजण गंभीर जखमी झाले असुन दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर संतप्त जमावाकडून बसची तोडफोड करण्यात आली आहे, तसेच आग लावण्यात आली.

शहरात मोहर्रम विसर्जनाची मिरवणूक निघाल्यानंतर मिरवणुकीत सहभागी झालेले काही पंजा वाद्यांच्या गजरात पंचगंगा नदीकडे निघाले होते. त्याचवेळी शिवाजी चौकाकडून गंगावेशकडे निघालेल्या केएमटी बसचा ब्रेक फेल झाला. चालकाचा ताबा सुटलेली ही बस मिरवणुकीतच घूसली. बसखाली चौदाहुन अधिकजण सापडल्याने एकच गोंधळ उडाला. या अपघातात तानाजी भाऊ साठे आणि सुजल भानुदास अवघडे यांचा जागीच मृत्यु झाला.

अपघातामुळे संतप्त जमावाने केएमटी बससह मदतीसाठी आलेल्या दोन फायर ब्रिगेड वाहनाची तोडफोड केली. यावेळी दगडफेक होऊन वातावरण दंगलसदृश्य झाले होते. दगडफेकीत एक सहाय्य महिला पोलीसह जखमी झाली. सर्व जखमींना छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळावर नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली होती. हजारहून अधिक लोकांचा जमाव घटनास्थळी आहे. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने जलद कृती दलाचे दोन तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

kolhapur-buss