ऊस तोडीचे पैसे परत मागितल्याने तरुणाला भोसकले


सामना प्रतिनिधी । लातूर

ऊस तोडणीसाठी पैसे घेऊनही ऊस तोडणीसाठी न आल्याबद्दल पैसे परत मागितले म्हणून चाकूने भोसकल्याची घटना उदगीर तालूक्यातील लोहारा येथे घटली. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी विठ्ठल संभाजी गायकवाड याने तक्रार दाखल केली. तो आपल्या आईसह तिवघाळ येथून आजीला भेटण्यासाठी लोहारा ता. उदगीर येथे मामाच्या गावी आला होता. त्याच्या मामाकडून नागराज नारायण कांबळे याने ऊस तोडणीसाठी म्हणून पैसे घेतले होते. पण तो ऊस तोडणीस गेला नाही. पैसेही परत दिले नाहीत. तो दिसला म्हणून फिर्यादी विठ्ठल याने ‘तू ऊस तोडीला गेला नाही, मामाचे पैसे परत दिले नाहीत’, असे म्हटले. मी पैसे परत करणार नाही तूला काय करायचे म्हणत थेट चाकूने वार केले आणि तीन ठिकाणी गंभीर जखमी केले. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.