१०वीच्या परीक्षा केंद्रावर राडा, चाकू हल्ल्यात तीन जखमी

सामना प्रतिनिधी । यावल

१० च्या विद्यार्थाला पीएसएमएस हायस्कूल या परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये वाद झाल्याने अंजाळेच्या तरुणाने मिनी कटर (चाकू) ने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तीन विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळते. यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

एका विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर सोडल्यानंतर त्या परीक्षा केंद्राचा दरवाजा निखील रवींद्र सपकाळे (२२, रा. अंजाळे) या संशयिताने बंद केला. त्यामुळे इतर विद्यार्थी आणि पालकांसोबत त्याची वादावादी झाली. त्यानंतर त्याने त्यांच्यावर चाकू हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. दरम्यान, फैजपूर पोलिसांनी त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

फैजपूरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने धाव घेत शांतता प्रस्थापित करून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर केली. संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या हल्ल्यात रुपेश गुणवंत ननवरे (वय १९), गौरव अरुण सोनवणे (वय १५), सागर भिमराव सोनवणे (वय २२), मोहित गोपाळ सोनवणे(वय १८,सर्व रा.बामणोद)हे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र यानंतर पोलिसांनी परीक्षाकेंद्रावर नियंत्रण मिळवल्याने परीक्षा सुरळीत पार पडली.