युतीलाच शंभर टक्के गुण – दक्षिण मुंबई वार्तापत्र

सामना प्रतिनिधी । मुंबई 

कोणतीही लाट आली तरी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा शिवडी, वरळीसारख्या गिरणगावातील मतदार. काँग्रेसकडे झुकणारा भायखळा, नागपाडा, कुलाबा भागातील मुस्लिम मतदार आणि मुंबादेवी, मलबार हिल, कफ परेडमधील भाजपची जमेची बाजू ठरणारा गुजराती, मारवाडी मतदार अशी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतांची मांडणी केली जाते. यावरून गणित केले तर सर्वाधिक मतदार हे शिवसेना-भाजप युतीचे आहेत. त्यामुळे शंभर टक्के गुण युतीलाच मिळणार आहेत.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील चार जागा या युतीकडे तर दोन जागा काँग्रेस आणि एमआयएमकडे आहेत. वरळी आणि शिवडी मतदारसंघ शिवसेनेने मजबूत करून ठेवले आहेत. कुलाबा आणि मलबार हिलमध्ये भाजपचे आमदार आहेत. मुंबादेवी मतदारसंघाचा विचार केला तर ती जागा सध्या काँग्रेसकडे असली तरी 2014 पूर्वी तिथे भाजपचाच जोर होता.

शिवसेना खासदार लोकसभेत टॉपर
दक्षिण मुंबई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अरविंद सावंत हे केवळ विकासकामांमध्येच नव्हे तर विविध नागरी प्रश्न संसदेत धडाडीने मांडणारे खासदार म्हणून लोकप्रिय आहेत. लोकसभेत ते खासदारांमध्ये टॉपर ठरले आहेत. त्यांनी लोकसभेत 286 वेळा चर्चेत सहभाग घेऊन सर्वसामान्यांच्या 478 प्रश्नांना वाचा फोडली. दांडगा जनसंपर्क असलेल्या सावंत यांच्या खासदार निधीतून मतदारसंघात विविध विकासकामे झाली आहेत. मुंबईकर लोकल प्रवाशांचे अनेक प्रश्नही त्यांनी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करून सोडवले आहेत.

काँग्रेसच्या वोट बँकेची विभागणी होणार
भायखळा मतदारसंघातील मुस्लिम मतदार ही काँग्रेसची परंपरागत वोट बँक म्हणून गणली जात होती. पण एमआयएमने मागच्या निवडणुकीत त्याला छेद दिला. यावेळी बहुजन वंचित आघाडीने एमआयएमशी हातमिळवणी केल्याने मुस्लिमांबरोबरच दलित वोट बँकही काँग्रेसच्या हातातून निसटण्याची दाट शक्यता आहे. अंतर्गत गटबाजीमुळेही काँग्रेसची स्वतःची मते फुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या एकंदर परिस्थितीचा फायदा निश्चितच युतीला होणार आहे.

उमेदवार कुणीही असो…धनुष्यबाणावरच शिक्का
परळ, लालबाग, वरळी, शिवडी, माझगाव हे शिवसेनेचे बालेकिल्ले या मतदारसंघात आहेत. तेथील मतदार धनुष्यबाणाशिवाय कोणतीही निशाणी मानत नाहीत असा इतिहास आहे. मग उमेदवार कुणीही असो. या भागातील शिवसेनेचे वर्चस्व विरोधकही जाहीरपणे मान्य करतात. शिवसेना आमदार आणि नगरसेवकांची केलेली विकासकामे हीसुद्धा जमेची बाजू आहे.

मतदारसंघातील आमदार
कुलाबा – राज पुरोहित (भाजप)
मुंबादेवी – अमीन पटेल (काँग्रेस)
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा (भाजप)
वरळी – सुनील शिंदे (शिवसेना)
शिवडी – अजय चौधरी (शिवसेना)
भायखळा – वारीस पठाण (एमआयएम)

नगरसेवकांची संख्या
शिवसेना – 17
भाजप – 10
काँग्रेस – 6
समाजवादी पार्टी – 1
अखिल भारतीय सेना – 1

मतदार वाढले
राज्यातील मतदारांची संख्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत 65,31,661 ने वाढली आहे. मुंबईतील पाच लोकसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या 4, 85, 700 ने घटलेली असताना दक्षिण मुंबईतील मतदारांच्या संख्येत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 46, 090 ने वाढली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात 2014 साली 14,85,356 मतदार होते ते वाढून आता 15,31,446 एवढे झाले आहेत.

उत्सुक नसलेले देवरा पुन्हा रिंगणात
काँग्रेसने जाहीर केलेल्या महाराष्ट्राच्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत मिलिंद देवरा यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. पक्षांतर्गत कटकटीला कंटाळलेल्या मिलिंद देवरा यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते, मात्र पक्षाच्या आदेशानंतर ते दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत.