कोहली हा धोनी द्रविड आणि सचिनपेक्षाही सरस कर्णधार!

हिंदुस्थानी क्रिकेटचा माजी कर्णधार सौरव गांगूलीने १९९६ साली झालेल्या इंग्लंडविरोधातील कसोटी सामन्यात पदार्पणातच मालिकावीर किताब जिंकला होता.

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दक्षिण अफ्रिकेत झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या विराट कोहलीच्या प्रेमात आता सौरव गांगुलीही पडला आहे. या दौऱ्यातील त्याच्या कामगिरीचं तोंड भरून कौतुक करताना गांगुली म्हणाला की त्याने या दौऱ्यात उत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे आणि विदेशातही हिंदुस्थानी संघ कसोटी मालिका जिंकू शकतो हा विश्वास त्याने संघात निर्माण केला आहे.

कोहलीच्या कर्णधारपदावरील कामगिरीबाबत बोलताना गांगुली म्हणाला की मी महेंद्रसिंह धोनी आणि राहुल द्रविड या दोघांना कर्णधारपदी बघितलं आहे. मात्र ज्या सातत्याने कोहलीला खेळताना बघतोय ते सातत्य मी इतर कोणातही बघितलेलं नाहीये असं म्हणतानाच गांगुलीने कोहली हा धोनी, द्रविड आणि सचिन तेंडुलकरपेक्षा सरस कर्णधार असल्याचं म्हटलंय. या तिघांनी एकतर उत्तम कर्णधारपद भूषवलं किंवा खोऱ्याने धावा केल्या. या तिघांना एकत्र कामगिरी करणं अवघड गेल्याचं निरीक्षण गांगुलीने नोंदविले आहे.

आगामी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी गांगुलीने कोहलीला एक सल्ला दिला आहे. या दौऱ्यासाठी संघाने थोडं आधी जावून सराव करावा ज्याचा तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यास संघाला फायदा होईल असं त्याचं म्हणणं आहे. हिंदुस्थानी संघात आक्रमकता आणणाऱ्या कर्णधारांमध्ये सौरव गांगुलीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. विराट कोहलीने गांगुलीच्या पावलावर पाऊल ठेवत संघाला आणि स्वत:ला मैदानात अधिक आक्रमक बनविले आहे.