अनियमितपणाच्या वादात अडकली कोकण रेल्वे

>>सुरेंद्र मुळीक<<

[email protected]

कोकणसाठी सोयीच्या गाड्या सुटल्या तर नाहीच, पण गाड्या वेळेवरसुद्धा पोहोचविल्या जात नाहीत. मग ती ५०१०५ दिवा-सावंतवाडी पॅसेंजर असो किंवा १०१०३ मांडवी एक्प्रेस असो प्रवाशांकडून एक्प्रेसचा दर आकारला जातो. मग या गाडय़ांना विलंब कशासाठी? १०११२ कोकणकन्या सकाळी मुंबईत आली की कोणतीही स्वच्छता न होता पुन्हा १०१०३ मांडवी बनून मार्गस्थ होते आणि १०१०३ मांडवी रात्री मुंबईत आली की त्याच पद्धतीने १०१११ कोकणकन्या बनून मार्गस्थ होते. कोणतीही साफसफाई नाही की वातानुकूलित प्रवाशांना नव्या चादरी दिल्या जात नाही. मुंबईत येणाऱया प्रवाशांनी ज्या चादरी वापरल्या त्याच पुन्हा प्रवाशांना दिल्या जातात. हे सारे दिवसाढवळय़ा होते

अनियमितपणा, अस्वच्छता आणि प्रवाशांना देण्यात येणाऱया वापरलेल्या चादरी यामुळे कोकण रेल्वे पुन्हा एकदा वादात सापडली आहे. तसे पाहिले तर अनियमितपणा आणि कोकण रेल्वे यांचे एक घट्ट नाते आहे. यामुळेच मागील २० वर्षे वेळ न पाळण्याच्या शर्यतीत कोकण रेल्वे प्रथम क्रमांकावर आहे. वेळ न पाळणाऱ्यांच्या पदरात नेहमीच अपयश येते असे म्हटले जाते. कोकण रेल्वेच्या बाबतीत हे सातत्याने दिसून आले. आपल्या सेवेची २० वर्षे पूर्ण केलेल्या कोकण रेल्वेला म्हणावे तसे यश अद्यापही मिळालेले नाही. सगळा कारभार रामभरोसे सुरू आहे. यामुळेच आज कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचे अधिक वर्चस्व दिसून येते. किंबहुना कोकण रेल्वेचा सारा कारभार मध्य रेल्वेवर अवलंबून आहे असे म्हटले तर ते अधिक योग्य ठरेल.

जानेवारी १९९७ रोजी महाराष्ट्राची हद्द ओलांडून कोकण रेल्वेने गोव्यात प्रवेश केला याला २० वर्षे झाली, पण ऐन तारुण्यात येऊनही कोकण रेल्वे थकल्यासारखी धावत आहे. याचे मुख्य कारण कोकण रेल्वे स्वतःचे अस्तित्व हरवून बसली आहे. या मार्गावर धावणाऱ्या ७५ हून अधिक गाडय़ांपैकी कोकण रेल्वे मुंबईहून फक्त चार गाडय़ा चालविते. त्याही रामभरोसे. दादर-रत्नागिरी, दिवा-सावंतवाडी या दोन गाडय़ा पॅसेंजर आणि कोकणकन्या व मांडवी या दोन गाडय़ा एक्प्रेस. या चारपैकी एकही गाडी मुंबईहून वेळेवर सुटत नाही आणि कधी सुटली तरीही नियोजित ठिकाणी कधीच वेळेवर पोहोचत नाही. याला सर्वस्वी जबाबदार केवळ आणि केवळ कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक आणि ऑपरेशन मॅनेजर संजय गुप्ता. त्यांच्याच निष्काळजीपणामुळे कोकण रेल्वेच्या गाडय़ा कधीच वेळेवर पोहोचत नाहीत आणि गाडीमध्ये अस्वच्छताही असते. याचा अर्थ यापूर्वी या गाडय़ा वेळेवर पोहोचत होत्या असेही नाही. कोकण रेल्वेचा मार्ग बांधणारे श्रीधरन गेले आणि त्यानंतर व्यवस्थापकीय संचालकपदी आलेल्या प्रत्येकाने निष्काळजीपणा केला. मग ते बी. राजाराम असो गोखले असो किंवा भानुप्रकाश तायल असो या सर्वांनीच कोकणला पर्यायाने महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक दिली. परिणामी कोकणसाठी सोयीच्या गाडय़ा सुटल्या तर नाहीच, पण गाडय़ा वेळेवरसुद्धा पोहोचविल्या जात नाहीत. मग ती ५०१०५ दिवा-सावंतवाडी पॅसेंजर असो किंवा १०१०३ मांडवी एक्प्रेस असो या गाडय़ा आपल्या नियोजित ठिकाणी कधीच वेळेवर पोहोचल्या नाहीत. एकेरी मार्ग असल्याने एखाद्या वेळेस पॅसेंजर गाडय़ांना बाजूला काढणे समजू शकतात. पण जेव्हा एक्प्रेस गाडय़ांना बाजूला काढून दक्षिणेकडील किंवा उत्तरेकडील गाडय़ांना पुढे पाठविले जाते तेव्हा ते जाणीवपूर्वक ऑपरेशन मॅनेजरने केलेले काम असते. १०१११ कोकणकन्या आणि १०१०३ मांडवी या दोन्ही गाडय़ा एक्प्रेस आहेत. प्रवाशांकडून एक्प्रेसचा दर आकारला जातो. मग या गाडय़ांना विलंब कशासाठी. १०१०३ मांडवी एक्प्रेसच्या बाबतीत तर साराच घोळ करून ठेवला आहे. कोकणच्या प्रवाशांना अतिशय सोयीची असलेली ही गाडी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ७ वाजता सुटते व मडगावला पोहोचण्याची वेळ ५.३०ची आहे तर सावंतवाडीला ४.१५ ची आहे. पण ही गाडी कधीच वेळेवर पोहोचत नाही. नेहमी २ ते ३ तास उशिरा धावते आणि कधी कधी तर ५-६ तास. यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वांचेच पुढील प्रवासाचे गणित कोलमडले जाते. मांडवी ही गाडी सकाळी सुटत असल्याने या गाडीत लहान मुले, महिला आणि वयस्क प्रवाशांचा अधिक भरणा असतो. ही गाडी जर आपल्या नियोजित वेळेत पोहोचली तर या गाडीसारखी सुखदायक गाडी कोकण मार्गावर नसेल, पण तसे होत नाही. यामुळे या गाडीला कोकणात ‘खरखटी’ गाडी म्हणून ओळखले जाते. एका गाडीचे प्रवाशांनीच नाव बदलल्याने कोकण रेल्वेची माणहानी होत आहे, पण व्यवस्थापकीय संचालक आणि ऑपरेशन मॅनेजर अशा दोन्ही पदांना कवटाळून बसलेल्या संजय गुप्ता यांना याबाबत काहीच वाटत नाही. मागील महिन्यात पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत मांडवी १०१०३ ही गाडी नेहमीच उशिराने धावण्यामागची कारणे काय? असे विचारले असता गुप्ता यांनी सरळ उत्तर न देता ‘माझ्या जागेवर येऊन बसा म्हणजे समजेल की ही गाडी नेहमीच का उशिरा धावते ती.’ हे उत्तर म्हणजे उशिराने धावत असणाऱ्या मांडवी गाडीवरील तोडगा नव्हे. एखाद्या दिवशी या गाडीला उशीर झाला तर समजता येईल, पण नेहमीच उशिराने धावत असेल तर उपाय काय. ही गाडी उशिराने का धावते यावर आपण अभ्यास करतो आणि ही गाडी वेळेवर कशी धावेल हे आपण पाहतो. अशा सामंजस्याच्या भूमिकेतून रेल्वे प्रशासनाने उत्तर दिले असते तर अधिक बरे झाले असते. पण जेव्हा प्रशासनातील अधिकारी मग्रुरीची भाषा वापरतात तेव्हा त्या संस्थेचा ढाचा कोसळला जातो.

कोकण रेल्वे प्रशासनातील अशा अनेक उर्मट अधिकाऱ्यांमुळे कोकण रेल्वेचा ढाचा कोसळलेला आहे. म्हणूनच या कोसळलेल्या ढाच्यावर मध्य रेल्वे आपले वर्चस्व गाजवीत आहे. कोकण रेल्वेच्या मडगावपर्यंतच मार्ग मध्य रेल्वेत विलीन करावा आणि मडगावातून ठोकूरपर्यंतचा मार्ग दक्षिण रेल्वेत विलीन करावा अशी अनेक वर्षांपूर्वीची मागणी आहे. मुंबईच्या दिशेने मध्य रेल्वेने आणि ठोकूरपासून दक्षिण रेल्वेने केलेले आक्रमण किंवा घुसखोरी पाहता कोकण रेल्वेचे ७६० कि.मी.च्या मार्गावरील अस्तित्व केव्हाच संपलेले आहे. कोकण रेल्वे प्रशासन केवळ नावापुरतेच राहिलेले आहे. कारण कोकण रेल्वेच्या मार्गावर कोणत्या जादा गाडय़ा सोडल्या जाणार, कोणती गाडी नव्याने सोडणार याचा निर्णय मध्य रेल्वे स्वतः घेते. या निर्णयप्रक्रियेत कोकण रेल्वेला घेतले जात नाही. यावरूनच कोकण रेल्वेची अवस्था काय आहे ते समजता येईल. पण ‘गिरा तो भी टांग उपर’ अशा थाटात कोकण रेल्वे प्रशासन वावरत असते. कोकण रेल्वेच्या धावणाऱ्या तीन गाडय़ांपैकी एकाही गाडीला मध्य रेल्वेच्या हद्दीत थांबण्यास दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच १०११२ कोकणकन्या सकाळी मुंबईत आली की कोणतीही स्वच्छता न होता पुन्हा १०१०३ मांडवी बनून मार्गस्थ होते आणि १०१०३ मांडवी रात्री मुंबईत आली की त्याच पद्धतीने १०१११ कोकणकन्या बनून मार्गस्थ होते. कोणतीही साफसफाई नाही की वातानुकूलित प्रवाशांना नव्या चादरी दिल्या जात नाही. मुंबईत येणाऱ्या प्रवाशांनी ज्या चादरी वापरल्या त्याच पुन्हा प्रवाशांना दिल्या जातात. हे सारे दिवसाढवळय़ा होते आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता उघडय़ा डोळय़ाने हे सारे पाहून न पाहिल्यासारखे करतात. याला सर्वस्वी जबाबदार कोकणची जनता आणि तेथील स्वयंभू नेते त्यांनी कोकण रेल्वेला कधी गंभीरतेने या गोष्टीचा जाब विचारला नाही म्हणूनच कोकण रेल्वे प्रशासनाचे हे धाडस होत आहे. दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे असे झाले असते तर तेथील जनता आणि नेते रस्त्यावर उतरले असते. याच पद्धतीने वागण्याची आता वेळ आली आहे.