कोकण रेल्वेची वाशिष्ठी, सावित्री, काळनदी पुलावर पूर सतर्क यंत्रणा

सामना ऑनलाईन । रत्नागिरी

गतवर्षी सावित्री नदीवरील पूल कोसळून दुर्घटना घडल्यावर नेहमीच अतिवृष्टीचा फटका बसणारी कोकण रेल्वे अधिक जागृत झाली आहे. पूर परिस्थितीमध्ये रेल्वे पूलाजवळ नदीने धोक्याची पातळी ओलांडताचा संदेश देणारी पूर सतर्क यंत्रणा कोकण रेल्वे मार्गावरील सावित्री नदीच्या रेल्वे पुलावर, काळ नदीच्या रेल्वे पुलावर आणि वाशिष्ठीच्या रेल्वे पुलावर बसविण्यात येणार आहे.

पूर सतर्क यंत्रणा ही गतवर्षी प्रायोगिक तत्वावर कोकण रेल्वेने वाशिष्ठी नदीच्या पूलावर बसवली होती. आता यंदा पासून ही यंत्रणा तीन ठिकाणी उभारण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. कोकणात प्रचंड पाऊस पडतो,अतिवृष्टीच्या काळात नद्यांना पूर येऊन मोठया प्रमाणात नुकसान होत असते. कोकण रेल्वेलाही पावसाचा दरवर्षी फटका बसतो. आपत्ती निवारणासाठी कोकण रेल्वे विविध उपाययोजना करत असून पूर परिस्थितीमध्ये उद्भवणारा धोका टाळण्यासाठी आता ही नवी यंत्रणा अमंलात आणली जाणार आहे. फ्लड अलर्ट सिस्टिम हि यंत्रणा रेल्वे पूलावर नदीच्या धोक्याच्या पातळीपूर्वी एक फूट अंतरावर बसविण्यात येणार आहे. ज्याक्षणी नदी धोक्याची पातळी ओलांडले त्यावेळी पूर सतर्क यंत्रणेचा पाण्याशी संपर्क येताच काही क्षणात नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याचा संदेश जवळच्या रेल्वेस्थानक आणि कोकण रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला जाणार आहे. नियंत्रण कक्ष तातडीने या मार्गावरून धावणाऱ्या गाड्या थांबवण्याबाबत निर्णय घेईल, अशी ही यंत्रणा आहे.