धोकादायक कोळंब पुलावरुन एसटी वाहतुक बंद

सामना ऑनलाईन । मालवण

मालवण-आचरा-देवगड़ मार्गावरील महत्वाचा दुवा असणारा कोळंब पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे बांधकाम विभागाच्या पाहणी अहवालात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी तातडीने निर्णय घेऊन प्रशासनाने मंगळवार (१७) पासुन या पुलावरुंन बस फेऱ्या बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे.

आगार व्यवस्थापक संजय बोगरे यांनी कोलंब पुल वाहतुकिस धोकादायक बनल्याचे बांधकाम विभागाचे पत्र प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कांदळगांव, मसुरे या मार्गासह आचरा, देवगड़ व् विजयदुर्ग या मार्गावर जाण्यासाठी प्रवाश्यांना आड़ारी, कातवड, ओझर हा ५ ते ७ किलोमिटरचा फेरा पडणार आहे. तर कोळब, सर्जेकोट व् रेवंडी या गावातील ग्रामस्थ, मच्छीमार व् शाळकरी विद्यार्थ्याना खाजगी वाहन हाच पर्याय असणार असुन या तीन गावांचा एसटी शी संपर्क तुटणार आहे

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एस. एस. भोंगे, अभियंता प्रकाश चव्हाण, एस. एस.बच्चू , प्रदीप पाटील यांनी कोळंब पुलाची पाहणी केली होती. या पाहणीत पुलाचे पिलर्स धोकादायक बनले असून पूल वाहतुकीस योग्य नसल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवासी व अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश बांधकाम विभागाने दिले असून संबंधिताना पत्रव्यवहार केला आहे.

कोळंब पुलावरून वाहतूक बंद करण्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर एसटीकडून तात्काळ कार्यवाही केली आहे. कोळंब पुलावरून मार्गस्थ होणाऱ्या बसफेऱ्या मंगळवार पासून मालवण-फोवकांडा पिंपळ-आडारी-कातवडमार्गे ओझर या पर्यायी मार्गाने मार्गस्थ होणार आहे. यात एसटी वाहतूक तीन ते पाच किमीने वाढणार असून प्रवाशांना तिकीटाचाही भुर्दंड सहन लागणार आहे. प्रवासी वर्गाने सहकार्य असावे असे आवाहन आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनी केले आहे.

पुलावर उभारणार दिड मीटरची कमान

पुलावरुन केवळ दुचाकी, रिक्षा व् छोटी कार यांनाच तातपुरता प्रवेश असणार आहे. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला दीड मीटर उंचीची कमान बांधली जाणार आहे. त्यामुळे ट्रक, टेम्पो आदी मोठी वाहने पुलावरून जावू शकणार नाहीत. दुरुस्ती सुरु झाल्यास पुल पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता पी. डी. पाटील यांनी स्पष्ट केले.