कोळंब खाडीपात्रात बारमाही जलपर्यटनाची मागणी

1

अमित खोत । मालवण

मालवण तालुक्यातील सर्वाधिक सुरक्षित अशा कोळंब खाडीपात्रात बारमाही जलपर्यटनास बंदर विभागाने सर्व्हे करून परवानगी द्यावी, अशी मागणी कोळंब ग्रामस्थ व पर्यटन व्यवसायिकांकडून बंदर विभागाकडे करण्यात आली आहे.

ग्रामस्थ व पर्यटन व्यवसायिकांनी याबाबतचे निवेदन मालवण बंदर अधिकारी अनंत गोसावी यांच्याकडे शनिवारी दिले. यावेळी कोळंब माजी सरपंच आबा कोयंडे, पर्यटन व्यवसायिक सतीश आचरेकर, गीतेश जोशी यांसह मोठ्या संख्येने कोळंब ग्रामस्थ व व्यवसायिक उपस्थित होते.

पावसाळी कालावधीचा विचार करता समुद्र खवळतो, त्याचा विचार करता जलपर्यटन २६ मे ते १ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवले जाते. मात्र, पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचा विचार करता येथे वर्षा सहलीसाठीही पर्यटक दाखल होण्याची संख्या जास्त आहे. त्यामुळे नव्याने काही पर्यटनस्थळे विकसीत होत आहे. त्यापैकीच एक म्हणजे मालवणची कोळंब खाडी. एक किलोमीटर लांब असलेल्या या खाडीपात्रातील प्रवाह अत्यंत संथ व खोलीही कमी असलेला आहे. खाडीच्या मुखावरच नैसर्गिकरित्या वाळूचे बेट (ड्रीम आयलंड) तयार झाले असून समुद्रातील लाटांचा कोणताही धोका समुद्र खवळला असतानाही जाणवत नाही. शांत व निसर्गरम्य अशा या परिसरात पर्यटकांची संख्या गेल्या काही दिवसात वाढत आहे. पर्यटन व्यवसायिक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने याठिकाणी सागरी जलपर्यटन सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तरी या खाडीपात्रातील सुरक्षित ठिकाणांचा सर्व्हे बंदर विभागाने करावा व बारमाही पर्यटन व्यवसायास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रोजगार निर्मितीही होणार
कोळंब खाडी पात्रात पर्यटन व्यवसाय वाढल्यास येथील स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार आहे. त्यासह हॉटेल व्यवसायासही चालना मिळणार आहे. तरी कोळंब ग्रामस्थांचा सहानभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वरीष्ठ कार्यालय निर्णय घेईल
जल पर्यटन व्यवसायाच्या परवानगीचे अधिकार महाराष्ट्र मुख्य बंदर कार्यालयास आहेत. त्यामुळे सर्वे व परवानगी याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. असे बंदर अधिकारी अनंत गोसावी यांनी स्पष्ट केले. दरम्यान पर्यटन व्यवसाईकांनी आपण मुख्य कार्यालयात परिपूर्ण प्रस्ताव सादर करू असे स्पष्ट केले.