मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा!

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण कसे देणार हे कायदेशीररीत्या स्पष्ट करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी कोल्हापूरच्या सर्वपक्षीय आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. त्यावर मागास आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यावर आणि विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विशेष अधिवेशन आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

कोल्हापूरमधील सर्वपक्षीय आमदारांच्या या शिष्टमंडळात शिवसेना आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबीटकर यांचा समावेश होता. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलक गेले 40 दिवस दसरा चौकात ठिय्या आंदोलन करत आहेत. अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनाची दखल घेत कोल्हापूर जिह्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री’ अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मागासवर्ग आयोगाचा अहवाल हाती आल्यावर लगेचच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून यात सरकार चर्चा करेल. त्याआधी अधिवेशन बोलावल्यास यामध्ये नव्याने कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. यावेळी बैठकीला खासदार राजू शेट्टी, आमदार अमल महाडिक, सतेज पाटील, संध्यादेवी कुपेकर, उल्हास पाटील, इंद्रजीत नरके, सत्यजीत पाटील, सुरेश हाळवणकर, हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.