सुसंवाद मंचातर्फे कोल्हार येथील नुकसान ग्रस्त कुटुंबियाना मदत

2

सामना प्रतिनिधी। कोल्हार

कोल्हार भगवतीपूर येथे शाँर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये चार कुटुंबाच्या संसाराची राख रांगोळी झाली. या उघड्यावर पडलेल्या कुटुंबास कोल्हार येथील सुसंवाद मंचच्या सदस्यांनी भेट दिली. येथील परिस्थिती पाहून हृद्य हेलावलेल्या सदस्यांनी तातडीने नुकसानग्रस्त चारही कुटुंबास राहण्यास निवारा उभारून देण्याचा निर्धार करून प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला.

23 तारखेच्या रात्री कोल्हार भगवतीपूर येथील शेतमजूर कुटुंबाच्या छपरास आग लागून एका 7 वर्षीय लहानग्याचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये दोन लहानगे व दोन युवक गंभीर जखमी झाले होते. त्यासोबत दोन शेळ्या आणि काही कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. कुटुंबाचे संसार उपयोगी साहित्य, रोख रक्कम, घरातील काही सोन्याचे दागिने असे सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाले होते. मंगळवारी सदर कुटुंबास सुसंवाद मंचच्या सदस्यांनी भेट दिली. सुसंवाद मंचच्या सदस्यांनी तातडीने चारही कुटुंबांना 50 ते 60 हजार रुपये खर्चून पत्र्याचे शेड उभारून देण्यास तातडीने प्रारंभ केला आहे. शहीद कुटुंबीयांना देण्यासाठी जमा केलेल्या शिल्लक रकमेतून नुकसानग्रस्त कुटुंबियांना आधार देण्याकरिता या रकमेचा विनियोग करण्यात आला.

सदर कुटुंबास काही प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी रोख 5 हजार रुपये देण्यात आले. त्याच सोबत शिवसेनेचे उपजिल्हा ( शिर्डी ) प्रमुख अनिल बांगरे यांनीही अडीच हजार रुपयांची मदत सदर कुटुंबास दिली. यापूर्वीही भगवतीपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक दातीर यांनी चारही कुटुंबियांस आधार देत जीवनावश्यक वस्तूं व रोख रकमेची मदत केली होती. सदर पत्र्याच्या शेडचे काम तातडीने मंगळवारी बांधण्यास प्रारंभ करण्यात आला. विजय मापारी या ठेकेदारानेही केवळ मजुरांना देण्यासाठी पैसे घेऊन आपली मदत या कुटुंबास केली आहे. यावेळी कोल्हारचे माजी सरपंच अॅड सुरेंद्र खर्डे. सुसंवाद मंचचे अध्यक्ष जितेंद्र खर्डे, सदस्य महेंद्र कुंकुलोल, शिवाजी निकुंभ, प्रमोद भगत, संजय शिंगवी, गणेश राऊत, अमोल खर्डे, विजय डेंगळे, पांडूरंग राऊत, संजय शिवलेकर आदी सुसंवाद मंचचे सदस्य उपस्थित होते.