पश्चिम बंगालमधील भाजपच्या रथयात्रेला उच्च न्यायालयाचा लाल झेंडा

सामना ऑनलाईन । कोलकाता  

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमधील रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. ही रथयात्रा शुक्रवारी बंगालच्या कुचबिहारपासून सुरू होणार होती. ९ जानेवारीला याबाबत पुढील सुनवाई होणार आहे तसेच तोपर्यंत या रथयात्रेला स्थगिती देण्यात आली आहे.  या रथयात्रेमुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवून उच्च न्यायालयाने या रथयात्रेला परवानगी नाकारली आहे.

राज्याचे महाधिवक्ता किशोर दत्ता यांनी न्यायालयात माहिती दिली की कुचबिहार जिल्ह्यात आधी धार्मिक दंगली उसळल्या अहेत. तसेच तिथे दंगली होण्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी या रथयात्रेला परवानगी न देताना जे पत्र दिले आहे त्याचा उल्लेख दत्ता यांनी केला. ते म्हणाले की, “भाजपच्या मोठ्या नेत्यांसह इतर नेते कुचबिहारमध्ये दाखल होतील. यामुळे जिल्ह्यात तणाव वाढू शकतो असे पत्रात नमूद केले आहे.”

ही रथयात्रा शांततेत पार पडेल असे भाजपने न्यायालयात सांगितले. तीन रॅलीच्या परवानगीसाठी भाजपने न्यायालयात धाव घेतली होती. या न्यायाधीशांनी विचारले की यात्रेदरम्यान जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याची जवाबदारी कोण घेणार? त्यावर भाजपने उत्तर दिले की, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची असते.

भाजपचे वकील म्हणाले की राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी संविधानाने दिली आहे. तसेच अनुचित प्रकार घडण्याच्या शक्यतेवरून अशा कार्यक्रमांना परवानगी नाकारता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. ही यात्रा तुम्ही रद्द करणार का अशी विचारणा न्यायालयाने भाजपला केली त्यावर भाजपने नकार देत या कार्यक्रमाची तयारी खूप आधीपासून सुरू असल्याचे सांगितले तसेच ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारकडे परवानगी मागितल्याचे त्यांनी म्हटले. व परवानगी मागिल्याच्या नंतर खुप उशिरा राज्य सरकारने ही परावनगी नाकारल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

सात डिसेंबरपासून भाजपची रथयात्रा सुरू होणार आहे. या यात्रेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा सामील होणार असून ही यात्रा पश्चिम बंगालच्या कूचबिहारपासून सुरू होणार आहे. तर ९ डिसेंबर ला २४ परगना जिल्हा आणि १४ डिसेंबर ला बीरभूमी जिल्ह्याच्या तारापीठ मंदिर पर्यंत या यात्रेचे मार्गक्रमण असणार आहे.