देऊळगावमहीची डॉक्टर युवती ठरली राष्ट्रीय मॉडेलिंग स्पर्धेची विजेती

सामना प्रतिनिधी । बुलढाणा/देऊळगावमही

पेशाने डॉक्टर असलेल्या एका युवतीने गोवा येथे नुकत्याच राष्ट्रीय स्तरावर झालेल्या परफेक्ट मॉडेल २०१८ या स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. तिच्या या यशामुळे महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

संडे मॉडेल एन्टरटेनमेंट या संस्थेव्दारा गोवा येथे ३० ऑगस्ट रोजी मिस्टर अ‍ॅण्ड मिस इंडिया परफेक्ट मॉडेल-२०१८ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून मोठ्या संख्येने मॉडेल युवक-युवती सहभागी झाले होते. या स्पर्धेत देऊळगाव मही येथील पेशाने डॉक्टर असलेल्या तसेच सध्या वर्धा येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत कोमल मदन खिल्लारे (२४) हिने सहभाग घेतला. या स्पर्धेत डॉ. कोमल हिने परीक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. देशभरातील अनेक मॉडेल्सना मागे टाकत डॉ. कोमल हिने मिस इंडियाज परफेक्ट मॉडेल हा खिताब पटकावला. डॉ. कोमल ही देऊळगावमही येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी आहे, जेथे मॉडेलिंग कोणताही गंध नाही. कोमल हिने आपल्या जिद्दीच्या आणि हुशारीच्या बळावर नुकतीच अकोला येथील मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली आहे.

कोमलचे प्राथिमक व माध्यमिक शिक्षण देऊळगावमही ते देऊळगावराजा प्रवास करीत पूर्ण केलेले आहे. काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेने डॉ. कोमल हिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करीत असतानाच मॉडेलिंगकडे वळली आणि तिने नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत हे घवघवीत यश संपादन केले. आपल्या यशाचे श्रेय कोमल ही आपल्या आई-वडिल व मित्रांसमवेत तिचे कार्यक्रम दिग्दर्शक तारीक खान, फॅशन कोरिओग्राफर इमरान शेख तथा सादिक कुरेशी यांचे आभार मानले आहेत. डॉ. कोमलचे हे यश मॉडेलिंगच्या क्षेत्रात नाम कमावू इच्छीणार्‍या जिल्ह्यातील युवक-युवतींसमोर एक आदर्श निर्माण करेल, यात काहीच शंका नाही.