सिंधुदुर्गात वाळू डंपर-चालक मालक संघटनेचा आंदोलनाचा इशारा

सामना प्रतिनिधी। कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू लिलाव न झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजूर, डंपर चालक-मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार वाळु लिलाव त्वरीत लावावा अन्यथा बुधवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहने उभी करून सर्व मालक-चालक धरणे आंदोलन छेडतील.दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा कुडाळ तालुका डंपर-चालक मालक संघटनेने गुरूवारी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

जिल्ह्याच्या बहुतांश भागात गौण खनिज उद्योग उदर निर्वाह म्हणून केला जातो. यामध्ये चिरे, वाळु, दगड असे गौण खनिज उत्खनन करून वाहतूक केली जाते. या व्यवसायात अनेक कुटूंबांचा उदरनिर्वाह चालतो. यात रोजंदारी मजूर हमाल, डंपर चालक, मालक व खाण मालक अशी सर्वांची कुटुंबे अवलंबून असतात. हा व्यवसाय शासनाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे शासनाच्या नियम अटींना अधिन राहून व शासकीय कर भरून व्यवसाय केला जातो. परंतु सध्यास्थितीत 31 मे 2018 अखेरीस बंद झालेला वाळु उत्खननाचा ठेका ऑक्टोबर 2018 अखेर पर्यंत म्हणजे तब्बल पाच महीने बंद आहे. पावसाळी काळात शासनाकडून वाळू उत्खननाच्या ठेक्यावर निर्बंध आहे. परंतु आता पावसाचा कालावधी संपुनही याबाबत प्रशासकीय हालचाल दिसुन येत नाही .त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. या व्यवसायावर अवलंबुन असणार्‍या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. डंपर व्यावसाईक बॅकांची कर्जे घेऊन व्यवसाय करीत असून कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. संघटने मार्फत वेळोवेळी याबाबतची निवेदने पालकमंत्री दिपक केसरकर, आ.वैभव नाईक, जिल्हाधिकारी, खनीकर्म अधिकारी तसेच बंदर विकास राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण आदींना दिलेली आहेत. मात्र आता आम्हाला ठोस निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे त्वरीत वाळु लिलाव लावून डंपर चालक -मालक यांना गंभीर समस्येपासुन दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्याकडे संघटनेने हे निवेदन सादर केले आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष नित्यानंद शिरसाट,धिरज परब, अभिषेक गावडे, चित्तरंजन सावंत, समीर दळवी, उल्हास नार्वेकर,ॠषिकेश वजराठकर, संदेश शिरसाट, उमेश दळवी, चेतन पडते, प्रदीप घाडी, विवेकानंद केरकर, दयानंद अणावकर, नितीन गावडे, संदेश मठकर, सुशिलकुमार कदम, देविदास नाईक, निलेश कनयाळकर(सचिव) आदी उपस्थित होते.