कोकण रेल्वे साडेचार तासानंतर पूर्वपदावर

सामना प्रतिनिधी । कणकवली

कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी नेमळे येथे दुरांतो एक्सप्रेसचे इंजिन दुपारी ३ वा. च्या सुमारास घसरले होते. त्यांनतर रेल्वेकडून युध्दपातळीवर उपाययोजना राबवत साडेचार तासात सायंकाळी ७ .३० वाजता वाहतूक पूर्वपदावर आणण्यास यश आले आहे. यासाठी सुमारे ८० ते ९० अधिकारी व कर्मचार्‍यांकडून प्रयत्न करण्यात आले. सायंकाळी ७ च्या सुमारास दुरांतो एक्सप्रेस सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाल्यानंतर रेल्वे ट्रॅकची दुरूस्ती करत वाहतूक सुरू करण्यात आली.

वाचाः कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन घसरले

दुरांतो एक्सप्रेसचे इंजिन घसरल्यानंतर कोकण रेल्वेकडून रत्नागिरी व मडगाव येथून इमर्जन्सी मेंटेनन्स व्हॅन मागविण्यात आली. ट्रॅकवरून बाजूला गेलेले इंजिन रूळावर आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे सायंकाळी ७ च्या सुमारास इंजिन बाजूला करण्यात यश मिळाले. नवीन इंजिनाला दुरांतो एक्सप्रेसचे डबे जोडून ती सावंतवाडीच्या दिशेने रवाना करण्यात आली. त्यानंतर विस्कळीत झालेले रेल्वे ट्रॅक जोडण्याचे काम सुरू करण्यात आले. रेल्वेचे कर्मचारी तसेच ठेकेदाराकडून जादा कर्मचारी घेत केलेल्या अथक प्रयत्नांनंतर रेल्वे मार्ग साडेचार तासात वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. वाहतूक सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी थांबविण्यात आलेल्या गाड्या रवाना करण्यात आल्या..