उद्धव ठाकरे यांची 18 एप्रिल रोजी कणकवलीत जाहीर सभा

28
uddhav-thackeray-hatkangale


सामना प्रतिनिधी। कुडाळ

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरूवार दि.18 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर येत आहेत. शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा.विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सायं.5 वाजता कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील भव्य पटांगणात पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. श्री.ठाकरे यांच्या या दौ-याने कोकणातील तमाम कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या सभेत श्री.ठाकरे काय बोलतात याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

कोकण आणि शिवसेना असे अतूट नाते आहे. शिवसेना हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे विशेष लक्ष कोकणावर आहे. अनेकवेळा त्यांनी कोकण दौरा केला आहे. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत व सहा पैकी पाच आमदार शिवसेनेचे आहेत. आता पुन्हा एकदा विद्यमान खासदार विनायक राऊत यांना या मतदारसंघात महायुतीची उमेदवारी मिळाली आहे. महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयासाठी संपूर्ण मतदारसंघात महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या कार्यकर्त्यांना अधिक प्रेरणा मिळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख श्री.ठाकरे सिंधुदुर्ग दौ-यावर येत असून कणकवलीत त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री ना.सुरेश प्रभू, शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे, राज्यमंत्री ना.रविंद्र चव्हाण, गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.दीपक केसरकर, आ.प्रसाद लाड, जिल्हाप्रमुख तथा आ.वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदींसह शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे सर्वच नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी यासभेला जिल्हावासियांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या