कोकणातील केळी विक्रेत्याचे पीएसआय परीक्षेत घवघवीत यश

सामना प्रतिनिधी। संगमेश्वर

तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथील ज्ञानू बाबू येडगे याला वयाच्या 14 व्या वर्षी रस्त्यावर केळी विकण्याची वेळ आली होती. केळी विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या ज्ञानूने आपला संघर्षमय प्रवास करत एम.पी.एस,सी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. तो देशात 161 वा आला आहे. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीयांनी अक्षरशः जल्लोष साजरा केला.

येडगेवाडीत राहणारे बाबू जानू येडगे यांना पुत्ररत्न नसल्याने त्यांने आपल्या सख्खे बंधू धोंडीबा जानू येडगे यांच्याकडून ज्ञानूला दत्तक घेतले होते. ज्ञानूला दत्तक घेतल्यानंतर त्यांना कृष्णा नावाचा मुलगा झाला. कृष्णा आणि ज्ञानू यांचे बालपणापासून त्यांनी पालन पोषण केले. ज्ञानू 14 वर्षाचा असताना त्यांच्या वडीलांचे ( बाबू जानू येडगे ) यांचे निधन झाले. घर चालवण्यासाठी कुटुंबात सक्षम व्यक्तीच नव्हती. वडिलांचा मुंबईतील धोबीतलाव येथे केळी विकण्याचा व्यवसाय होता. वयाच्या 14 व्या वर्षी ज्ञानूने हा व्यवसाय करायला सुरुवात केली. केळी विकून त्याने आपले माध्यमिक आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

ज्ञानूने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथमच एअर इंडिया कंपनीत सुरक्षा विभागात नोकरीला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मुंबई एअरपोर्ट व नंतर पुणे एअरपोर्टला बदली करुन घेतली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या परीक्षेत 2013 ला यशाने त्याला फक्त एका मार्काने हुलकावणी दिली. 2012 ते 2017 या पाच वर्षाच्या काळात ज्ञानू ने लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पी.एस.आय पदासाठी चारवेळा मुख्य परीक्षा तर तर विक्रीकर निरीक्षक पदासाठी 2 वेळा मुख्य परीक्षा दिल्या. पाच वर्षाच्या काळात त्याने खूप मेहनतीने ,जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास केला कुटुंबातील भावांनीही धैर्याने साथ देत त्याचे मनोबल वाढवण्यासाठी मदत केली. 2017 ला पी.एस.आय पदासाठी घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण 1410 उमेदवारांपैकी ज्ञानू 161 क्रमांकावरुन त्याची निवड झाल्याचे कळताच त्याच्या निवडीमुळे कुटुंबाने आनंदोत्सव साजरा करत पेढे वाटले.

रत्नागिरी जिल्ह्यात धनगर समाजामधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून थेट पी.एस.आय पदी निवड होण्याचा मान मिळवणारा ज्ञानू येडगे हा पहिलाच तरूण ठरला आहे. आजपर्यंत रत्नागिरीत धनगर समाजातील एकही तरुण अथवा तरुणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून थेट निवड झालेल्याचे उदाहरण नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांचा 8 मार्चला निकाल होता त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. निवडीचा निकाल हाती आल्यानंतर ज्ञानूचा आनंद द्विगुणित झाला. मला जे यश मिळाले ते पहायला माझे वडील नाहीत आणि मला प्रोत्साहन देणारा 2018 या वर्षात दुःखद निधन झालेला माझा चुलत भाऊ नामदेव नाही याची खंत त्याने व्यक्त केली.