कूपर रुग्णालयात मिळणार दिव्यांग प्रमाणपत्र

सामना प्रतिनिधी, मुंबई

दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य सरकारने पालिकेला दिले असून जुहू येथील पालिकेच्या कूपर रुग्णालयात यापुढे दिव्यांग व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र केंद्राचे उद्घाटन दोन दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या विविध योजना व सोयीसुविधा यांचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे दिव्यांग प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र पूर्वी केवळ शासकीय रुग्णालयांद्वारेच देण्यात येत असे. मात्र याबाबत महापालिका रुग्णालयांच्या स्तरावरदेखील दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे निर्देश राज्य शासनाद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वतीने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर सर्वोपचार रुग्णालय’ येथील मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या नोंदणी कक्षांच्या बाजूला ‘दिव्यांग प्रमाणपत्र केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र केंद्राद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधितांना विहित नमुन्यात व आवश्यक अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणेही गरजेचे आहे. यानंतर अर्जदारास आवश्यक त्या शारीरिक चाचण्यांसाठी तारीख व वेळ देण्यात येईल. या चाचण्यांनुसार ज्या व्यक्तींची दिव्यांग टक्केवारी 40 टक्क्यांपेक्षा अधिक असेल त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित व्यक्तीला दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजना व सोयीसुविधांचा लाभ घेता येऊ शकेल, अशीही माहिती डॉ. गणेश शिंदे यांनी दिली.

अपंगत्व प्रमाणपत्राकरिता कूपर रुग्णालयात वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली असून अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे हे मंडळाचे अध्यक्ष असतील. सुरुवातीला दर बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत सुरू राहणाऱ्या या केंद्रामुळे मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना ‘दिव्यांग प्रमाणपत्र’ मिळविणे अधिक सुविधाजनक होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी दिली आहे. त्याकरिता आधारकार्ड, फोटो ओळखपत्र, निवासाचा दाखला याची आवश्यकता असून फक्त मुंबईत राहणाऱयांनाच हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

summary- kooper hospital will give disability certificate