फाशी की जन्मठेप! आज फैसला

सामना ऑनलाईन । नगर

कोपर्डी अत्याचार व हत्या प्रकरणाचा खटला नगर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोषी ठरविल्यानंतर आरोपींच्या शिक्षेची सुनावणी आज होणार आहे. कोपर्डी अत्याचार व हत्याप्रकरणी आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे यांना दोषी धरून विविध आठ कलमांतर्गत त्यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यात आले आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत, तर आरोंपीच्या वतीने अॅड. योहान मकासरे, अॅड. बाळासाहेब खोपडे व अॅड. प्रकाश आहिरे हे काम पाहात आहेत. आतापर्यंत या घटनेमध्ये ३१ साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या होत्या.

‘कोपर्डी अत्याचार व खून ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. नराधमांनी थंड डोक्याने कटकारस्थान करून हे कृत्य केले आहे. क्रौर्याला धर्म, जात, पंथ नसतो. त्यांना घडलेल्या घटनेचा पश्चात्ताप झाल्याचे दिसत नाही. तसेच गुन्हेगारांना कमीत कमी शिक्षा दिल्यानंतरही ते सुधारतील याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. त्यामुळे या तिन्ही दोषींना फाशीचीच शिक्षा द्यावी’, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिक्षेसंदर्भात २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आरोपींना जन्मठेप की फाशीची शिक्षा होणार याचा निर्णय आज होणार आहे.