कोपरगावात डिजिटल इंडियाच्या घर पोहच सिलेंडरचा काळा बाजार

सामना प्रतिनिधी। कोपरगाव

डिजिटल इंडिया अंतर्गत घरपोच गॅस सिलेंडरचा कोपरगावात सर्रासपणे काळाबाजार सुरू आहे. सबसिडी जमा झाल्याचा मेसेज तर येतो पण सिलेंडर घरी पोहचतच नसल्याच्या तक्रारींच्या संख्येत वाढ होत आहे.

डिजिटल इंडिया अंतर्गत घरपोहच गॅस सिलेंडर देण्याचा सर्वत्र सुकाळ असताना भारत गँसची ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भारत गँसचे तालुक्यात तब्बल १५ ते २० हजार ग्राहक असूनही सिलेंडरचा मात्र तुटवडा आहे. तर दुसरीकडे ग्राहकांच्या नावावर परस्पर बुकिंग केल्या जात आहेत. सिलेंडर भरून गाडी आली तर जागेवरच वाटप केले जात असल्याने व त्यातमोठा काळाबाजार असल्याने ग्राहकांना सिलेंडरच मिळेनासे झाल्याने महिला वर्गात संताप व्यक्त होत आहे. काही ग्राहकांनी याबाबत आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कडे तक्रारी केल्या असून त्यांनी तरी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

तालुका पुरवठा अधिका-याचे याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याने ग्राहकांचे मात्र प्रचंड हाल होत आहे. सिलेंडरचा काळा बाजार यामुळे ऑनलाईन सिलेंडर योजनेचा तर फज्जा उडाला आहे. सिलेंडर संपले तरी एजन्सीकडून सिलेंडर च्या गाड्या बोलविले जात नाहीत बोलविल्या तरी त्या वेळेवर येत नाहीत आल्या तरी जागेवरच सिलिंडरचे वाटप केले जाते ऑनलाईन बुकींग कुठेही तारतम्य पाळले जात नाही वाटप सिलेंडर वाटप प्रणालीत गोंधळ घालून घालून तांत्रिक फुगवटा निर्माण करून तुटवडा असल्याचा आभास निर्माण करून काळ्याबाजाराला वाव देण्याचा फंडा वापरला जात आहे.

आधार लिंकिंग करणाऱ्यांना मिळणारे अनुदानित गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल व्यावसायिक मोठया प्रमाणात करत असून, व्यावसायिक सिलिंडरवर मोठया प्रमाणात आवक कमी होत आहे. तर दुसरीकडे अनेकवेळा गॅस सिलिंडरचे अनुदान ग्राहकास मिळत नसल्याच्या तक्रारीही होत आहे.दरम्यान याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन सोमनाथ मोरे तालुका पुरवठा अधिकारी यांनी दिले आहे.