चार विद्यार्थ्यांकडून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण

सामना प्रतिनिधी। कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील औताडे विद्यालयातील 4 विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यानंतर एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली . याप्रकरणी मुलाचे पालक व सरपंच अमोल औताडे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली होती. मात्र जोपर्यंत या विद्यार्थ्याला न्याय मिळत नाही व दोषी विद्यार्थ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत विद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्राचार्य कोकाटे यांच्या लेखी आश्‍वासनानंतर सरपंच अमोल औताडे व पालकांनी बंद मागे घेतला.

तालुक्यातील पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री ग र औताडे पाटील विद्यालयात बुधवारी इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या अविनाश भाऊसाहेब कांदळकर या विद्यार्थ्याला शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना भालेराव संदीप रामा ,तपासे रोहन विनायक, शेंडगे अक्षय आनंदा, कुदळे अजिंक्य काशिनाथ या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अडवले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर अविनाशला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच रात्री शिर्डी पोलीस स्टेशनला पालक व सरपंच अमोल औताडे यांनी यांनी याबाबत रितसर तक्रार दाखल केली.

यावेळी पालकांनी शाळेत मोठी गर्दी केली होती. शिर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जाने, पोलीस हवलदार शेंडगे पोलिस व्हॅन घेऊन विद्यालयात दाखल झाले होते. प्राचार्य कोकाटे यांनी रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी 13 डिसेंबर रोजी विद्यालयात येणार आहेत त्यांच्यासोबत या घटनेची सर्व चौकशी करून पुढील कारवाई करू असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हा तणाव निवळला.