कोरेगाव-भीमा दंगल सरकार पुरस्कृत, विरोधकांचा विधान परिषदेत आरोप

सामना ऑनलाईन । मुंबई

कोरेगाव-भीमा येथील दंगल ही सरकार पुरस्कृत होती. या दंगलीचे सूत्रधार हे भाजपशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेत केला. या दंगलीनंतर महाराष्ट्र बंद काळात झालेल्या घटनांमध्ये दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

विधान परिषदेत कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी आज आपत्कालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे म्हणाले, १ जानेवारी रोजी विजय दिन असताना सरकारमधील मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री ३१ डिसेंबरलाच कोरेगाव-भीमामध्ये जाऊन आले याचा अर्थ त्यांना घडणाऱ्या दंगलीची माहिती होती का? त्या दिवशी सकाळी जमाव चालून आला तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखले नाही. या दंगलीचा सूत्रधार मिलिंद एकबोटे आहे. संभाजी भिडे गुरुजीही यामध्ये सक्रिय होते. त्यांचा भाजपशी संबंध आहे.

कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरातील जागा शासनाने ताब्यात घ्यावी आणि तेथे स्मारक बांधावे अशी मागणी रणपिसे यांनी केली. भाजपचे भाई गिरकर म्हणाले, दंगलीनंतर पुकारलेल्या बंद काळात दलीत तरुण विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. जयदेव गायकवाड यांनी हे प्रकरण सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळले. स्थानिक लोकांमध्ये वर्षानुवर्षे बंधुभाव होता. मात्र एकबोटे यांनी तेथे बैठका घेऊन हे सगळे घडवून आणल्याचा आरोप केला. प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, गोविंद गोपाळ यांच्या समाधीची मोडतोड झाली. त्यातून हे प्रकरण पुढे आले. राज्यात ८ हजार जणांवर गुन्हे दाखल आहेत ते मागे घ्यावेत. या चर्चेत विद्या चव्हाण, प्रकाश गजभिये यांची भाषणे झाली. या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी उत्तर देणार आहेत.