कोरठण खंडोबा श्रद्धा भक्तीची यात्रा दि २१ ते२३ जानेवारी २०१९

11

सामना प्रतिनिधी । नगर

महाराष्ट्रासह अनेक राज्यामधील लोकांचे श्री खंडोबा कुलदैवत आहे. श्री खंडोबा हा भगवान श्री शंकराचा अवतार आहे. मनी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी, ऋषी मुनी तसेच देवदेवता यांच्या विनंतीवरुन भगवान श्री शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. मार्तंड भैरवाच्या या अवतारात श्री खंडोबाने, मनी व मल्ल या दैत्यांचा सहा दिवस चाललेल्या युध्दात संहार करुन सर्व ऋषीमुनी देवदेवतांना संतुष्ट केले. या युध्दात श्री खंडोबाच्या सैन्याचा चंपाषष्ठीला मोठा विजय झाला. म्हणुन सर्व ऋषीमुनी व देवदेवतांनी ‘सदा आनंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’ असा विजयाचा जयघोष केला. म्हणून भाविक भक्त तळी भंडार करताना, ‘सदा आनंदाचा येळकोट,’ ‘भैरवनाथाचे चांगभले’, ‘अंबाबाईचा उदोउदो’ असा जयघोष करतात.

भगवान शंकराचे मार्तंड भैरवाचे अवतार कार्य पूर्ण झाल्यावर, श्री भगवान शंकर निजधामाला जाण्यास निघाले. त्या समयी कोरठण या ठिकाणी कोरपडीचे मोठे बन (जंगल) होते. भगवान श्री शंकर येथे निजधामाला जाण्यासाठी समाधी लावून बसले. त्यावर कालांतराने वारुळ तयार झाले. त्या बनात एक गुराखी गायी चारावयास नियमितपणे येत असे. त्यांचे गायीं पैकी एक कपिला गाय दिवसातून काही वेळ अदृष्य होत असे. गुराख्याने गायीवर पाळत ठेऊन तीच्या पाठीमागे जाऊन शोध घेतला तेंव्हा गाय वारुळावर जाऊन आपल्या स्तनातून दुधाच्या धारा त्या वारुळावर सोडत असल्याचे पाहून गुराखी अचंबित झाला. गुराख्याने वारुळा वरील माती बाजुला केली. त्या खाली खडकासारखा स्वयंभू तांदळा व पुढे बारा लिंगे दिसली. त्यावर पिवळ्या भंडाराचे दर्शनही घडले. तेथे गुराख्याला देवाच्या अस्तित्वाची प्रचिती आली. तो गुराखी पुढे रोज गाईच्या दुधाने स्वयंभू तांदळा आणि बारा लिंगावर अभिषेक करु लागला.

याच कथेवरुन कोरठणचा खंडेराया हा मराठी चित्रपट सन 2007 साली प्रदर्शित करण्यात आला. कोरपडीच्या बनात गुरे चारणारा गुराखी हे गायकर नावाचे होते व ते ब्राम्हणवाडा येथील होते. त्यांनी देवाला प्रथम पाहिले व सेवा केली म्हणून ब्राम्हणवाडा गावाची मानाची काठी यात्रेला येते. बेल्हागावचे विश्वासराव गुमास्ते यांनी स्वत:वरील चोरीचा आरोप देवाने दूर केला म्हणून, मुळ मंदिराचे बांधकाम केल्याचा उल्लेख येथील शिलालेखात मिळतो. त्यामुळे बेल्हा गावची मानाची काठी यात्रेला येते. या दोन्ही काठ्यांना देवाच्या कलव्हर्‍या मानल्याचा उल्लेख खंडोबा गाण्याच्या पारंपारिक गाण्यात आला आहे. तसेच इतरही गावांच्या मानाच्या पालख्या व मानाच्या काठ्या यात्रेला येण्याची परंपरा चालू आहे. त्याबाबतच्या दंतकथाही वेगवेगळ्या आहेत.

असा हा श्री क्षेत्र कोरठण खंडोबा लाखो भाविकांचे कुलदैवत म्हणून प्रसिध्द आहे. नगर व पुणे जिल्ह्यातील सरहद्दीवर पारनेर तालुक्यातील पिंपळगांवरोठा गांवापासून पश्चिम दिशेला श्री कोरठण खंडोबाचे वैभवशाली मंदिर आहे. मुळ मंदिर शके 1491 मध्ये बांधकाम केल्याचा शिलालेख आहे. समुद्र सपाटीपासून 951 मीटर उंचीवर विस्तिर्ण भुप्रदेशावर श्री खंडोबाचे विलोभनीय मंदिर मनाला प्रसन्नता देते. सन 1988 ला यात्रेतील पशुहत्या बंदी यशस्वी झाली. सन 1992 पासूनग्रामस्थांनी देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष ऍड.पांडुरंग गायकवाड यांच्या पुढाकारने मदिर जिर्णोद्धाराचे काम सुरु झाले. शुद्ध चंपाषष्ठी दि. 5 डिसेंबर 1997 ला ब्रम्हलीन प. पु. स्वामी श्री गगनगिरी महाराजांचे हस्ते मंदिराच्या नवीन बांधलेल्या शिखरावर सुवर्ण कळस स्थापन करण्यात आला. त्यानंतर देवस्थानचे वैभवाला, प्रगती व विकासाला गती मिळाली. येथे दरवर्षी पौष पौर्णिमेला 3 दिवस मोठा वार्षिक यात्रा उत्सव भरतो.

संपुर्ण देशात अनेक मंदिरांमध्ये घडवून बसविलेल्या मूर्ती आहेत. तसेच स्वयंभू तांदळारुपातील मूर्ती असलेली ही मंदिरे आहेत. या सर्व मूर्तींच्या मूळ स्वरुपात बदल करता येत नाही. परंतु कोरठणच्या खंडोबाच्या बाबतीत आगळे वेगळे महत्व आहे. येथील तांदळा स्वरुपातील मूर्तीचे रुप रोज नव्याने, हाताच्या बोटांनी साकारले जाते. आदल्या दिवसाचे स्वरुप, दुसर्‍या दिवशी सकाळी तांदळा मूर्तीला, पुजारी अंघोळ घालतात. चंदन उगाळुन त्यामध्ये चांदीचे डोळे बसवितात. गंधाने देवाचे मुख, नाक इत्यादी, हाताचे बोटाने अधोरेखीत करतात. तांदळामूर्ती वरील दोन्ही बाजूला स्वयंभू रुपातील बाणाई व म्हाळसा यांनाही गंध लावून अधोरेखीत करतात. शाल चढवून पगडी ठेवतात, त्यावर फुलांची शेज लावतात व हार घालतात. तेव्हा देवाचे स्वरुप नव्याने साकारलेले दिसते. संपूर्ण हिंदुस्थानात, रोज नव्याने देवाचे स्वरुप साकारणारी ही एकमेव स्वयंभू तांदळामूर्ती असावी. यात्रा उत्सवात लाखो श्रध्दाळू भक्त येथे नतमस्तक होतात. यात्रा कालावधीमध्ये स्वयंभू तांदळामूर्तीवर चांदीची सिंहासन पेटी ठेवतात. त्यावर देवाच्या चांदीच्या उत्सवमूर्ती विराजमान करुन साज़ शृंगार करतात. त्यामुळे यात्रा उत्सवात देवाचे शृंगार दर्शन घडते.

मार्च 2010 मध्ये शासनाने सदर तिर्थक्षेत्राला राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर केला. रुपये 1 कोटी निधीमध्ये भाविक भक्तांना सुविधा झाल्या आहेत. भाविक भक्तांचे देणगीमधून देवस्थान तर्फेही अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आता शासनाने देवस्थानाला पर्यटनक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला आहे. त्याद्वारे नविन सुविधा होतील.अशा या वैभवशाली तिर्थक्षेत्रावर या वर्षी पौष पौर्णिमा दि. 21/1/2019 ते दि. 23/01/2019 पर्यंत मोठा यात्रा उत्सव भरणार आहे. पौष पौर्णिमेला श्री खंडोबाचे म्हाळसा बरोबर लग्न झाले म्हणून हा यात्रा महोत्सव येथे भरतो. महाराष्ट्रातील 6 लाखांवर भाविक भक्त यात्रेकरु या यात्रेला गर्दी करतील. देवस्थान व प्रशासनाने त्यानुसार अनेक उपाय योजनांचे नियोजन केलेले आहे. एस.टी तर्फे जादा 50 गाड्यांचे नियोजन आहे. पिण्याचे पाणी देवस्थान तर्फे पुरविण्यात येत आहे. पोलीस व होमगार्ड, क्रांतीशुगर साखर कारखान्याचे सुरक्षा पथक, अळकुटी महाविद्यालयाचे व जयमल्हार विद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक, वाहतुक नियंत्रण, दर्शनबारी, आरोग्य सेवा इत्यादी नियोजन करण्यात आले आहेत.

सन 2014 ते 2015 मध्ये देवस्थानजवळ मार्तंडभैरव अवतारातील श्री खंडोबा-म्हाळसा घोड्यावरील भव्य पितळी मूर्ती व मंदिराचे कळस काम पुर्ण होऊन देवस्थानच्या वैभवात भर पडली आहे. सन 2016 मधील चंपाषष्ठी महोत्सवात परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांच्या मूर्तीची ध्यान मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. भाविक भक्तांना कुलदैवत खंडोबा दर्शनाबरोबर, श्री महाराजांचेही दर्शन, मूर्ती रुपात होत आहे. देवाच्या पालखीसाठी शाही रथ सन 2018 साली बनविण्यात आला आहे. सभामंडप 1ला मजला हॉलचे बांधकाम चालू आहे.

या यात्रेत हजारो किलो भंडाराची मुक्त उधळण होते. शेती औजारे, खेळणी व संसार उपयोगी वस्तुंची रेलचेल यात्रेत पाहवयास मिळते. सर्व मानाच्या पालख्या व मानाच्या काठ्या यांच्या मिरवणुका डोळ्यांचे पारणे फेडतात. देवस्थानने भक्तांना अधिक माहिती होण्यासाठी आपली वेबसाईट www.korthankhandoba.org केलेली आहे. देवस्थानला संपर्क करणेसाठी 02488-281228,281370 फॅक्स नं. 281300, मोबा. 9822620142 उपलब्ध आहे.