कोयना धरण शंभर टक्के भरले; दोन फुटाने दरवाजे उचलले


सामना ऑनलाईन । कराड

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर पूर्ण मंदावला असून, धरणात 104.60 टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरण तांत्रिकदृष्टय़ा भरल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे रविवारी चौथ्या वेळी दोन फुटाने उचलण्यात आले आहेत. सध्या धरणातून 20 हजार 698 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.

कोयना धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी 22 ऑगस्टला साडेसहा फुटांपर्यंत दरवाजे उचलण्यात आले होते. गुरुवारी दि. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता पाणीसाठा नियंत्रणात आल्याने सांडव्यावरून करण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र, पावसाचा जोर कमी झाला असताना जलाशयात प्रतिसेकंद 7 हजार 373 क्युसेक्सने पाण्याची आवक होत असून, पाणीसाठा 104.60 टीएमसी झाल्यामुळे आज सकाळी सहा वाजता पाणीसाठा नियंत्रणासाठी धरण व्यवस्थापनाने दरवाजे एक फुटाने आणि रात्री 8.30 वाजता अर्ध्या फुटाने उचलून दोन फुटांवर करण्यात आले.

सध्या पायथा वीजगृहातून व वक्र दरवाजातून असा एकूण 20 हजार 698 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. जलाशयाची पाणीपातळी 2162.11 फूट झाली आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगरला 20 (5191) मिलिमीटर, नवजाला 12 (5654) मिलिमीटर व महाबळेश्वरला 33 (4966) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.