उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा देशपातळीवरचा पुरस्कार कोयना धरणाला बहाल


सामना प्रतिनिधी, कराड

केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळामार्फत 2018 सालचा उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा देशपातळीवरचा पुरस्कार कोयना धरणाला जाहीर करण्यात आला. नवी दिल्ली येथे केंद्रीय ऊर्जा मंत्री (स्वतंत्र कार्यभार) आर. के. सिंग यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ठ धरण व्यवस्थापनासाठीचा देशपातळीवरचा पुरस्कार कोयना धरणाला जाहीर होणे ही महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाचीच बाब आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याकरता जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबईचे सचिव राजेंद्र पवार, जलसंपदा विभाग पुणेचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, मुख्य अभियंता (मंत्रालय मुंबई) एन. व्ही. शिंदे, सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती वैशाली नारकर, कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने हा पुरस्कार स्विकारला.

केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळ 1927 मध्ये भारत सरकारद्वारे उभारण्यात आलेली एक अग्रगण्य संस्था आहे. ही संस्था सिंचन व ऊर्जा क्षेत्रातील संबंधित व्यावसायिक संस्था, अभियंते आणि व्यक्तींना गेली 90 वर्षे समर्पित सेवा देत आहे. 1963 पासून आजपर्यंत 55 वर्षे कोयना प्रकल्पाची उत्कृष्ठ देखभाल, दुरुस्ती, परिचलन व नियोजन केल्याबाबत कोयना धरणास हा पुरस्कार देण्यात आला. कोयना धरणाची साठवण क्षमता गेटची उंची पाच फूट वाढवून 105.25 टीएमसी एवढी केली आहे. तसेच 1999 व 2012 या वर्षी लेक टॅपिंग करुन जलाशयाची एमडीडीएल 630.17 वरून 618 मीटर केली आहे. त्यामुळे 15.12 टीएमसी अतिरिक्त पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी करणे शक्य झाले आहे. 1967 च्या 6.5 क्षमतेच्या भूकंपानंतर धरणाचे 1973 व 2004 ते 2007 या कालावधीत मजबुतीकरण केले आहे. तसेच प्रकल्पातून 1962 पासून आजपर्यंत 1960 मेगावॅट क्षमतेने वीज निर्मिती केली जात आहे.

धरणाचे बांधकाम होऊन आता 55 वर्ष झाले आहेत. तर कोयना भूकंपाला देखील 50 वर्ष झाले आहेत. केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळामार्फत कोयना धरणास देण्यात आलेला पुरस्कार हा गेल्या 50 वर्षात धरणाची निगा उत्कृष्ट पध्दतीने राखल्याने देण्यात आला आहे. उत्कृष्ठ धरण व्यवस्थापनासाठीचा देशपातळीवरचा पुरस्कार कोयना धरणाला जाहीर होणे ही महाराष्ट्र राज्यासाठी खऱ्याअर्थाने अभिमानाचीच बाब म्हणावी लागेल.