एल्गारचा यल्गार! राहुलच्या झुंजार शतकानंतर एल्गारचे नाबाद शतक

के. एल. राहुलच्या झुंजार आणि जिगरबाज शतकाने हिंदुस्थानला 245 धावापर्यंत मजल मारता आली, पण त्यानंतर डीन एल्गारच्या शतकी यल्गाराने (आक्रमणाने) दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटीच्या दुसऱया दिवशी 5 बाद 256 अशी धावसंख्या उभारून दिली. अंधुक प्रकाशामुळे आजही 20 षटकांचा खेळ कमी झाला. खेळ थांबला तेव्हा एल्गार 140 तर माकाx यान्सन 3 धावांवर खेळत होता आणि यजमानांनी 11 धावांची माफक आघाडी मिळवली आहे.

राहुल दा जबाव नहीं…
हिंदुस्थानचे दिग्गज धारातीर्थी पडत असताना लोकेश राहुल एकटा लढला. तो केवळ लढला नाही तर त्याने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचारही घेतला. मंगळवारच्या 8 बाद 208 या धावसंख्येत राहुलच्याच 31 धावांची भर पडली. त्याने दोन वर्षांपूर्वी आपले सहावे शतक याच खेळपट्टीवर आणि याच ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत ठोकले होते. आज त्याची पुनरावृत्ती करताना त्याने कसोटी कारकीर्दीत सातवे शतक साजरे केले. दोन वर्षांपूर्वी राहुलच्या शतकामुळे हिंदुस्थानने पहिली कसोटी जिंकली होती. यंदा त्याची पुनरावृत्ती होते की नाही ते तिसऱया दिवशी कळेल. राहुलच्या शतकामुळेच हिंदुस्थान 245 पर्यंत पोहचू शकला.

हे हिंद्स्थानी क्रिकेटचे टॉप टेन शतकांपैकी एक शतक

राहुलच्या जिगरबाज शतकी खेळीवर अवघ्या जगातून काwतुकाचा वर्षाव होत असताना महान फलंदाज सुनील गावसकर यांनी या खेळीला ‘हिंदुस्थानी कसोटी क्रिकेटच्या टॉप टेन शतकांपैकी एक’ असल्याचे म्हटले. या कसोटीचे समालोचन करताना गावसकर म्हणाले, मी गेली 50 वर्षे क्रिकेट पाहतोय. त्यामुळे मी छातीठोकपणे सांगू शकतो, ही हिंदुस्थानी कसोटी क्रिकेटमधल्या दहा सर्वोत्तम शतकी खेळींपैकी एक आहे. सुपर स्पोर्ट्सची खेळपट्टी अद्भुत होती. अशा खेळपट्टीवर कोणताही फलंदाज स्वतःचा सेट समजू शकत नाही. चेंडू कसाही जात होता. अशा स्थितीत ही खेळी लाजबाव असल्याचे गावसकर म्हणाले.

एल्गारसमोर हिंदुस्थानी थंडगार

राहुलच्या शतकामुळे हिंदुस्थानने आव्हानात्मक मजल मारल्याचे समाधान गोलंदाजांना होते. त्यातच मोहम्मद सिराजने 11 धावा असताना एडन मार्करमच्या रूपाने आफ्रिकन डावाला पहिला हादरा दिला. ही विकेट हिंदुस्थानी संघासाठी स्फूर्तिदायक होती, पण आपली शेवटची कसोटी मालिका खेळत असलेल्या डीन एल्गारने हिंदुस्थानच्या जोशावर विरजण टाकले. त्याने टॉनी डी झोर्झीबरोबर 93 धावांची भागी रचली. अखेर ही जोडी पह्डण्यात जसप्रीत बुमराला यश लाभले आणि त्याने 9 धावांत 2 विकेट मिळवत हिंदुस्थानी संघात पुन्हा चैतन्य आणले. पण आजचा दिवस एल्गारचाच होता. त्याने पदार्पणवीर डेव्हिड बेडिंगहॅमच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 131 धावांची भागी रचत सामन्यावर आफ्रिकेची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपले चौदावे शतकही साजरे केले. विशेष म्हणजे त्याने हिंदुस्थानविरुद्ध नऊ वर्षांनंतर शतकी धमाका केला.

या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेने कसोटीत मोठी आघाडी घेण्याचे आपले संकेत दिले आहेत. पण तिसऱया सत्रात ही जमलेली जोडी पह्डण्यात सिराजने बाजी मारली आणि जाता जाता पदार्पणवीर प्रसिधकृष्णाने आपली पहिली विकेट घेत आफ्रिकेला पाचवा धक्का दिला. उद्या कसोटीवर आपली पकड पुन्हा मिळविण्यासाठी एल्गारच्या शतकी खेळीला रोखणे हेच हिंदुस्थानी गोलंदाजांसमोर सर्वात मोठे आव्हान असेल.