कृष्णा बोरकर

1

>>प्रशांत गौतम<<

सात दशकांहून अधिक काळ चित्रपट, रंगभूमीवर आपल्या कार्यकर्तृत्वाची नाममुद्रा अधोरेखित करणारे बोरकर काका गेले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा एक साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. रंगभूमीच्या क्षेत्रात अनेक दिग्गज कलावंतांची बोरकर काका म्हणजेच कृष्णा बोरकर यांनी रंगभूषा केली आणि या सात दशकांच्या कालावधीत दोन पिढय़ांचा अनुबंधही निर्माण झाला. केवळ रंगभूमीवरच त्यांनी पडद्यामागचे कलाकार म्हणून भूमिका बजावली असे नाही, तर रुपेरी पडद्यावरही आपल्या जादुई रंगसंगतीने अनेक दिग्गज कलावंतांच्या चेहऱयास नवा आकार दिला. आपल्या सिद्धहस्त कलेतून कलावंताच्या चेहऱयास अधिक देखणे करून ती व्यक्तिरेखा अधिक प्रभावी केली. रंगभूमी असो की रुपेरी पडदा असो, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या कलेतील सच्चेपणा जपला. त्यांच्या कलेची खासियतच अशी होती की, या रंगसंगतीने आणि बदललेल्या चेहऱ्याने भलेभले कलावंतही खूश होत असत. ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’ असाच काहीसा प्रत्यय त्यांना येत असावा. वयाच्या अकराव्या वर्षापासून सुरू झालेला हा प्रदीर्घ प्रवास वयाच्या ८५ व्या वर्षी थांबला.

तब्बल ७० वर्षे बोरकर काका हाताला रंग लावून श्रेष्ठ कलावंताच्या चेहऱयावर अधिक देखणेपणा आणत. अकराव्या वर्षी हाताला लावलेला हा रंग ८५ व्या वर्षीही तसाच टिकून होता. कलावंताच्या स्वभावाचे प्रतिबिंबही या रंगसंगतीत आपसूकच उमटत असे. केशवराव दाते, बाबूराव पेंढारकर,  व्ही. शांताराम, नानासाहेब फाटक, मा. दत्तराम, वसंत शिंदे, मधुकर तोरडमल, डॉ. काशीनाथ घाणेकर, यशवंत दत्त अशा दिग्गज कलावतांची रंगभूषा बोरकर काकांनी केली. ‘साईबाबा’ या चित्रपटासाठी सुधीर दळवी यांचा ट्रायल मेकअपही बोरकर काका यांचाच होता. बोरकर काकांनी विद्याधर गोखले यांच्या ‘रंगशारदा’ आणि यशवंत पगार यांच्या ‘श्रीरंग साधना’ यांच्यासाठीही प्रारंभीच्या काळात योगदान दिले होते. उमेदीच्या काळात चित्रपती व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत काम करण्याची संधी मिळाली. ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’ या लोकप्रिय चित्रपटांचे सहायक रंगभूषाकार म्हणून त्यांना योगदान देता आले.

कृष्णा बोरकर ११ वर्षांचे होते तेव्हा कामगार रंगभूमीवर ‘सूडाची प्रतिज्ञा’या नाटकासाठी स्वतंत्र मेकअपमन म्हणून पांडुरंग घुले यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यानंतर केशवराव दाते यांच्या ‘शिवसंभव’ या नाटकासाठी रंगभूषेचे काम केले. पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘पृथ्वी गोल आहे’ हे बोरकर यांची स्वतंत्र रंगभूषा असलेले पहिले व्यावसायिक नाटक होते. त्यानंतरच्या काळात प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ यांच्यासमवेत नाटय़संपदामध्ये काम केले. नाटय़संपदामधून वाघ बाहेर पडल्यावर बोरकरांनी चंद्रलेखामधून ‘गरुडझेप’, ‘स्वामी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘नटसम्राट’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘रंग उमलत्या मनाचे’, ‘रमले मी’, ‘दीपस्तंभ’, ‘गगनभेदी’, ‘रणांगण’ अशी एकापेक्षा एक श्रेष्ठ नाटके रंगभूमीवर गाजली. बोरकर हेच या नाटकांचे रंगभूषाकार होते. विश्राम बेडेकर लिखित ‘रणांगण’ या नाटकात तर १७ कलाकार आणि ६५ प्रकारच्या रंगभूषा होत्या. हे अवघड कामही बोरकर काकांनी लीलया साकारले.

कृष्णा बोरकर यांना या वैविध्यपूर्ण योगदानासाठी राष्ट्रपतीच्या हस्ते संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने तसेच राज्य सरकार आणि नाट्य परिषदेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकात रंगभूषेसाठी दिला जाणारा महत्त्वाचा पुरस्कार बोरकर काकांना प्राप्त झाला होता. त्यांच्या ‘एक्झिट’मुळे रसिक मनाच्या हृदयावर सात दशकं अधिराज्य गाजवणारा चेहऱ्यांचा जादूगारच हरपला आहे…