बीडमध्ये क्षीरसागरांनी ताकद दाखवून दिली

129

सामना प्रतिनिधी । बीड

बीड लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर कुठल्या तालुक्यातून कुणाला कितीची लीड मिळाली याबाबत चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक प्रचार काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सात माजी आमदार आणि दोन विद्यमान आमदार युतीचा पराभव करण्यासाठी एकवटले होते. याचवेळी आमदार जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी युतीच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना जाहीरपणे पाठिंबा देऊन बीड विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना- भाजपा- रिपाइं महायुतीला बळ मिळाले. क्षीरसागर बंधूंनी सारी ताकद पणाला लावली. परिणामी युतीच्या उमेदवार डॉक्टर मुंडे यांचे पारडे जड झाले. त्यांना मिळालेल्या 6 हजार 262 इतक्या मतांची आघाडीत नि:संशय क्षीरसागर बंधूंचा हातभार आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आणि आमदार जयदत्त क्षीरसागर प्रचारात उतरणार की नाही याबाबतची चर्चा सुरू झाली. पक्षांतर्गत सुंदोपसुंदी चालू असतानाच क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांचे मत जाणून घेतले. विविध संघटना आणि समाजातील व्यापारी, प्रतिष्ठितांची बैठक घेऊन त्यांचेही मत विचारात घेतले आणि त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. बीड मतदारसंघातून जेव्हा क्षीरसागर प्रचारात उतरले तेव्हा त्यांचे सगळेच विरोधक एकवटले होते. सात माजी आमदार आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे तसेच आमदार विनायक मेटे हे देखील युतीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी रणांगणात सज्ज झाले मात्र बीड मतदारसंघात आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य नियोजन करून बीड मतदारसंघातून डॉक्टर प्रीतम मुंडे यांना आघाडीचे मतदान मिळवून दिले. जातीयवादाच्या आणि अपप्रचाराच्या मुद्द्याला खोडून विकासाची साथ द्या सबका साथ सबका विकास यासाठी युतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन करत क्षीरसागर यांनी तळागाळातील मतदारांपर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या आणि त्यात त्यांना यश देखील आले आहे. सारे शिलेदार एकवटले असताना बीड मतदारसंघातून मतांची आघाडी मिळणे ही विधानसभेची नांदी आजच क्षीरसागर यांनी जिंकली असल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या