Jadhav case : आंतरराष्ट्रीय न्यायालयात मंगळवारपर्यंत सुनावणी स्थगित

सामना ऑनलाईन । हेग

आंतरराष्ट्रीय न्यायालयात सोमवारपासून कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. ही सुनावणी 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या प्रकरणी हिंदुस्थानकडून हरीश साळवे बाजू मांडत आहे. तर पाकिस्तानकडून अटर्नी जनरल अन्वर मंसूर खान यांच्या नेतृत्वाखालचे पथक बाजू मांडणार आहे. सोमवारी 2.30 वाजता हिंदुस्थानने बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्थानकडे 5.30 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. संध्याकाळी हिंदुस्थानने आपली बाजू मांडल्यानंतर सुनावणी मंगळवार पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. मंगळवारी पाकिस्तान त्यांची बाजू मांडणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 20 तारखेला संध्याकाळी 7.30 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत हिंदुस्थान बाजू मांडणार आहे. तर 21 तारखेला पाकिस्तान बाजू मांडणार आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाल्यापासून हरीश साळवे पाकड्यांचा खोटारडेपणा जगासमोर मांडत आहेत. कोणत्याही देशाने आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करणे योग्य नाही. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे. दोन्ही देशांनी सहमतीने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हिंदुस्थानी नौदलाचे माजी अधिकारी कूलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवत त्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षी सुनावली आहे. या निर्णयाविरोधात हिंदुस्थानने आंतराराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. व्हिएन्ना करारातील अटीशर्तींचा उल्लेख करत साळवे पाकिस्तानला घेरत आहेत. या कराराचे उल्लंघन करत पाकिस्तान हिंदुस्थानातली निष्पाप नागरिकांचा बळी घेत असल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे. जाधव यांना हिंदुस्थानशी संपर्क साधण्यास मनाई करणे आणि त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही, हे या कराराचे उल्लंघन असल्याचे साळवे यांनी स्पष्ट केले. साळवे यांनी हिंदुस्थानची बाजू भक्कमपणे मांडत पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला आहे. त्याला पाकिस्तान काय उत्तर देणार हे मंगळवारी समजणार आहे.