आपमध्ये ‘विश्वास’घात, केजरीवाल यांच्या पक्षाला तडे जाणार?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आम आदमी पार्टीने राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱ्या तीन उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. यामध्ये राज्यसभेच्या जागेसाठी प्रमुख दावेदार असलेल्या कुमार विश्वास यांचा पत्ता कापला गेला असल्याने त्यांनी केजरीवालांवर टीकास्र सोडलं आहे. आपने त्यांच्या कोट्यातून संजय सिंह, नवीन गुप्ता आणि सुशील गुप्ता यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे पक्ष फुटण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

आपच्या आठ सदस्यांच्या समितीने राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवार ठरविण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने तीन नावांवर शिक्कामोर्तब केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे दोघेही दिल्ली बाहेर असल्यामुळे समितीने कोणताच निर्णय घेतला नव्हता. हे दोन्ही नेते दिल्लीत आल्यानंतर केजरीवाल यांच्या घरी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या १२ वर्षांपासून चळवळीत घाम गाळणाऱ्यांना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पदापासून दूर ठेवलं जात आहे. आम्ही पक्ष वाढवला त्याचंच हे फळ असल्याचा टोला कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांना लगावला. तसेच प्रत्येक वेळेस मी खरं बोललो. विविध प्रश्नांवर सातत्याने बोलत होतो, त्याचंच मला हे फळ मिळाल्याचं सांगत त्यांनी केजरीवाल यांच्या विरोधात बंड केलं. आहे. चळवळीशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीना राज्यसभेवर पाठविण्यात येत असल्याचंही ते म्हणाले. ५ जानेवारी रोजी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.