काँग्रेस-जेडीएसचे अखेर जमले; सोनिया गांधी,राहुल यांच्याशी चर्चा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

कर्नाटकचे नियोजित मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काँगेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन कर्नाटकातील नियोजित सरकारच्या प्रारूपावर आज अखेर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे काँगेस-जेडीएस आघाडीमध्ये खोडा घालण्याचे भाजपाचे मनसुबेही उधळले गेले. कुमारस्वामी यांनी सोनिया व राहुल यांच्याशी २० मिनिटे चर्चा करून सरकार स्थापण्याच्या प्रकियेवर चर्चा केली. त्याचबरोबर कर्नाटकामध्ये निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांचीही कुमारस्वामींनी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

आम्ही दबावतंत्र वापरून सत्तापदे मिळविण्यासाठी नाही तर एकविचाराने सरकार चालविण्याबाबत कटिबद्ध आहोत. याचसंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. उपमुख्यमंत्रीपदाबाबत तसेच इतर सत्तावाटपाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार काँगेस अध्यक्षांनी काँगेसचे कर्नाटक प्रभारी वेणुगोपाल यांना दिले आहेत. उद्या (ता.२२) त्यांची भेट घेऊन सत्तेचा फॉर्म्युला निश्चित करू असे कुमारस्वामी यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कर्नाटकातील विजयानंतर मुख्यमंत्रीपदी आरूढ होण्यापूर्वी कुमारस्वामी यांनी आज मायावती यांची भेट घेतली. मायवतींसोबतच्या निवडणूकपूर्व आघाडीमुळे धर्मनिरपेक्ष जनता दलाला मोठा राजकीय फायदा मिळाला. त्याबद्दल कुमारस्वामी यांनी मायावतींचे आभारही मानले तसेच शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याच निमंत्रणही दिले.

बहुसंख्य नेत्यांना शपथविधीचे आवतण
कुमारस्वामी यांनी बुधवारी होणाऱ्या शपथविधीसाठी देशातील बहुतांश प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण दिले आहे. त्यात तृणमूल काँगेसच्या ममता बॅनर्जी, बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक, इनोलोचे अभय चौटाला, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू, तेलंगणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव, संयुक्त जनता दलाचे शरद यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांचा समावेश आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेसुद्धा कुमारस्वामी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

परमेश्वरा की डी. शिवकुमार
काँगेसकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी ज्येष्ठ नेते परमेश्वरा यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे, मात्र देवेगौडा व कुमारस्वामींच्या हसन या बालेकिल्ल्यात काँगेसला चांगले यश मिळवून देणारे नेते व कुमारस्वामींच्याच वक्कलिंग समाजाचे नेते डी. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी देऊन कुमारस्वामींना काटशह देण्याचा काँगेसमधील एका गटाचा प्रयत्न आहे. मात्र, वक्कलिंग मुख्यमंत्री असताना काँगेस सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन उमेदवार ठरविण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्रीपदी मुस्लिम उमेदवार असावा असा प्रस्ताव कुमारस्वामींनी काँगेसकडे पाठवला होता, मात्र काँगेसने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे समजते. त्यामुळे परमेश्वरा यांचे नाव तूर्तास तरी आघाडीवर आहे.