कुंभारी बाजार ग्रामपंचायत सरपंचाचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

355

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार व कारला ग्रुप ग्रामपंचायत येथील सरपंच चंद्रकांत प्रल्हाद जुमंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन शासकीय जागेवर अतिक्रमण केले. ही बाब तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिलेल्या अहवालावरुन सिद्ध झाली आहे. चंद्रकांत जुमंडे यांचे सरपंच आणि सदसत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिले आहे. या प्रकरणी अ‍ॅड. सुनील बागल यांनी रमेश पवार यांची बाजू मांडली.

परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार येथील ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत पिता प्रल्हाद जुमंडे यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याच गावचे रमेश सुदामराव पवार यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन दोन्ही पक्षकारांना नोटीसा बजावण्यात आल्या. ग्रामपंचायतीची निवडणुक ऑगस्ट 2015 मध्ये झालेली आहे. निवडून आल्यानंतर सरपंचांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करुन कुंभारी कार्यक्षेत्रात असलेली नमुना नं. 8 मालमत्ता क्र. 378 व 379 वरील घरावर गैर कायदेशिररित्या अतिक्रमण केले आहे. वास्तविक महसूल नोंदी प्रमाणे नमुना 8 मध्ये गायरान जमीन आहे. नारायण जुमंडे, उद्धव जुमंडे व वडील प्रल्हाद जुमंडे या सर्वांनी मिळून शासकीय गायरान जमिनीवर अवैधरित्या ताबा केलेला आहे. शासनाची दिशाभूल करून स्वत:च्या पदाचा गैरवापर केला आहे, असा ठपका सरपंचावर ठेवण्यात आला. या उलट सरपंचांनी केवळ निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे नैराश्यातून मनोकल्पीत आरोप असून बनावट कागदपत्राअधारे प्रकरण दाखल केले आहे, असा युक्तीवाद करण्यात आला. या प्रकरणी तहसीलदार विद्यारण कडावकर यांनी स्थळ पाहणी करुन पंचनामा केला. कागदपत्राचे अवलोकन केले असता, शासकीय जमीन अशी नोंद आहे. या दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी तहसीलदार कडावकर यांच्या अहवालावरुन कुंभारी येथील सरपंच चंद्रकांत जुमंडे यांचे सरपंचपद व सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत. रमेश पवार यांच्या वतीने अ‍ॅड. सुनील ए. बागल यांनी बाजू मांडली.

आपली प्रतिक्रिया द्या